योगीराज प. पू. बालदास महाराज यांचे चरित्र

ते हि प्राणा परौते | आवडती मज निरुते | जे का भक्‍त चरित्राते | प्रशंसिती || (ज्ञा.म.)

dada maharaj manmadkar photo

भारत हा ऋषी – मुनी, सिद्ध – साधु, संत, महंत, ज्ञानवंत-पुण्यवंत, पावित्र्य-चारित्र्य संपन्न, कृपाळू, उदार, दयाळू महात्म्यांचा परमकरूणावंत योगी, तपस्वी, यशस्वी, ओजस्वी, सच्चिदानंद स्वरुप ब्रह्मसाक्षात्कारी सद्गुरुंचा देश. या भारत भूमीत सुजल-सुफल समृद्ध निसर्गरम्य वनराई बरोबरच निरंजनाची साधना संवर्धित होणारी आराधना-उपासना सिद्धीस नेणारी, जोपासना करणारी गिरीकंदरात अरण्याश्रमी गुरुकृपेची कर्म-भक्ती ज्ञानपीठे निर्माण झाली. बीज-फलन्यायाने हिच प्रेरक पार्श्वभूमी पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हयातील शाहूवाडी तालूक्यातील श्री क्षेत्र-सौते शिरगांव येथील योग प्रधान भूमिका धारण करणारी मठ-मंदिरे आज वर्धिष्णु भूमिकेत विराजमान आहेत. परमपुजनीय विश्‍वोधारक संत सद्गुरु, योगीराज जंगली महाराज, योगीराज श्रीकृष्णदास महाराज, योगीराज बालदास महाराज या गुरु परंपरेतून आलेल्या पुण्यप्रभावातून हि पतितपावन दीनोद्धारक विश्‍वात्मक बंधुभावाची प्रथम भिक्षा नंतर दिक्षा देणारी योग पीठे जन्मास आली. महायोग पीठस्थ परब्रह्म परमात्मा पांडुरंगराय त्याची लीला विग्रही परम सौभाग्यधारिणी विश्वमाता भगवती रुक्मिणी देवी या “बापरखुमा देवीवरु” ब्रह्मांड व्यापी शक्‍ती – भक्तीच्या, (परम भाग्याने) लाभलेल्या कृपाशिर्वादातून गेल्या ४२ वर्षापूर्वी श्री क्षेत्र सौते येथील मठात परमपूज्य योगीराज बालदास महाराजांच्या दर्शनाचा योग आला. या योगाचे माध्यम संत सद्‌गुरु गाडगे बाबांचे निष्ठावंत अनुयायी माझ्या तिर्थरुप प. पू. आई-वडीलांचे गुरुबंधू वै.प.पू.य.तु. शिंदे बाबा (कापशीकर) प्रतिवर्षी मार्गशीर्षातील १ल्या गुरुवारी कीर्तनाची सेवा प. पू. योगीराज बालदास महाराजांच्या उपस्थितीत आग्रही अनुग्रहाने सौते येथे मोठया भक्तिभावाने घडत असे. महाराज समाधिस्थ झाल्या पासून आज पावेतो ती कीर्तन सेवा आज ही शिरगाव येथे त्यांच्या पुण्यतिथी नामसप्ताह सांगतेस अखंड चालू आहे.

श्री. संत योगीराज बालदास महाराज चरित्राचे लेखक पांडुरंग द. पवार शिक्षण क्षेत्रातील सुप्रसिद्ध अनुभवी क्रांतदर्शी आहेत. ते महाराजांचे स्थळ-काळ-परिस्थिती-ख्याती-उपस्थिती या बाबत निकटवर्ती आहेत. भाषा, प्रादेशिक वैशिष्ट्ये, लोकजीवन, चालिरीती, रुढी, परंपरा, धर्म भावना जनसामान्यांच्या श्रद्धा भावजीवन यांच्याशी त्यांचे साहचर्य सलोखा जवळीक यांमुळे चरित्रात उद्‌भुत आणि अद्‌भुत घटनांचे सामरस्य, सुबोधता, सुरसता, भावार्थपूर्ण यथार्थता, कृतार्थता या साहित्य गुणांची समृद्धी आली आहे. सर्व सामान्य भाविकांस समजेल, पचेल, रुचेल, मानवेल असे हे चरित्र लोकजीवनातील चारित्र्याचे व भावविश्वातील पावित्र्याचे उन्नयन करणारे प्रभावी व प्रासादिक होईल. श्रद्धा ज्ञानाचा प्राण आहे हे सर्व कल्याणकारी सत्य तत्व महत्व धार्मिक व मार्मिक अनुभूतीने धारण केल्यास अंधश्रद्धा उन्मूलन-पूर्वक प्रज्ञा चक्षूंचे दिव्य दृष्टीने उन्मीलन उन्नयन-प्रणयन प्रबोधन घडते. यात संदेह नाही लेखक महोदयांची ही चरित्र लेखन सेवा सर्वेश्‍वर-परमेश्वर-योगेश्वर चरणी समर्पित होवो. जनता जनार्दनाचे जीवन संत संस्कृतीने धर्मार्थाने, भावार्थाने, परमार्थाने, पुरुषार्थाने परिपूर्ण होवो ही योगेश्वर पुरुषोत्तम चरणी प्रार्थना.

signature dada maharaj manmadkar

माता पिता, जन्म व बालपण

पवित्र ते कुळ, पावन तो देश (तु.म.)

योगीराज प. पू. बालदास महाराज यांच्या जन्मस्थानचा मान शाहुवाडी तालुक्‍यातील सावर्डे खुर्द या भाग्यवान खेडेगावास मिळतो म्हणजेच महाराजांचा जन्म त्यांच्या आजोळी झाला.

सावर्डे हे खेडेगाव म्हणजे शंभरटक्के शेतकऱ्यांचे गाव, कष्टकरुन पोटाला भाकरी खाणाऱ्या कष्टकऱ्यांचे गाव. या गावात महाराज जन्मले म्हणून जणू काय करवंदाच्या जाळीत गुलाब हसल्याचाच अनुभव.

यांच्या वडिलांचे नाव विठोबा होते. मातेचे नाव जिजाबाई होते. गरीब घराण्यातील ही गरीब माणसं तशी स्वभावाने राजा सारखी होती. सौते हे त्यांचे वास्तव्याचे गाव या गावात ती गुणी म्हणून ओळखली जात होती. कुणाची लांडीलबाडी कधी त्यांनी केली नाही. कोणाचं पसाभर आणलं आणि परत न घालता बुडवलं असं त्या गावात अजूनही शोधून उदाहरण मिळणार नाही. शेती करणारी पण भाविकपणानं जगणारी अशी ही मातापित्याची जोडी होती. पंढरपूरचा पांडूरंग हा त्यांचा देव. आषाढी – कार्तिकी त्यांचं पंढरीला जाणं व्हायचं. पंढरीचा पांडुरंग सर्व काही करतो. अशी त्यांची पक्की श्रद्धा. आपणाला जन्म देण्याचे काम, तारण्याचे काम आणि मारण्याचेही काम हाच पतितपावन पांडुरंग करतो असं त्यांचं ठाम मत आणि त्याचमुळं त्यांच्या घरात विठ्ठलाची आरती कधीही चुकायची नाही. देवाची पूजा आणि आरती केल्याशिवाय ते कधीच जेवले नाहीत.

प.पूज्य बालदास महाराजांचे वडिल विठोबा परिस्थितीने जरी गरीब होते तरी ते मनाने फार विशाल होते. त्यांचं मन सात्विक, सालस आणि श्रद्धासंपन्न असं होतं. महाराज म्हणत की माझे वडिल फार चांगले होते. ते धार्मिक होते. विठ्ठलांभोवती त्यांनी भक्‍तीभावाची माळ गुंफली होती. ते चिलीम ओढत असत व चिलीम ओढताना ते जाणाऱ्या येणाऱ्यांना म्हणत, या मारा एक झूरका आणि पळा आपल्या कामाला. चिलमीचा दम कामाला जोम देतो होय का नाय? ओढणारा ओढत ओढतच म्हणायचा, होय होय अगदी खरं हायं तुमचं.

विठोबाचं औदार्य फार होतं. आपणाकडं जे असेल ते दुसऱ्याला दिल्याशिवाय त्यांना बरंच वाटायचं नाही. मग कुणी खुरपं मागो, कुणी वैरणीसाठी लांब दोरी मागो, कुणी शेतीचं औजार मागो… इत्यादी गोष्टी देण्याबाबतीत ते उत्सुक असत.

प. पूज्य महाराजांच्या मातेचे नाव जिजाबाई असं होतं. जिजाबाईचे माहेर सावर्डे होते. जिजाबाई अंगापिंडानं चांगल्या होत्या. त्यांचं माहेरचं नाव तेच आणि सासरचही नाव तेच होतं. सौ. जिजाबाई आणि विठोबा या दोघांचं लग्न बालपणीच झालं होतं. त्यावेळी बालविवाहाची पद्धत होती. सौ. जिजाबाई पतीशी एकरुप होती. तिची मुद्रा पतीच्या मुद्रेत लोप पावली होती. असं म्हटल्यास अतिशयोक्ती मुळीच होणार नाही ती महान पतित्रता होती. सतत उदयोगाची कास धरणारी ती कामकरी स्त्री होती. तिला वावगं खपायचं नाही. सर्वांनी चांगलं वागावं आणि चांगलं बोलाचालावं असं तिचं मत होतं. जे देव देतो ते आपण साऱ्यांनी वाटून खावं. अशी तिची शेजारपाजाऱ्यांना शिकवण असायची. नवऱ्याचा भक्तिमार्ग तिला प्रिय होता. गोरा कुंभार, चोखामेळा, सावतामाळी, इत्यादी संतांनी संसार करुन परमेश्वर साध्य केला हेच तत्व तिला मान्य होतं. आपलं पोटाचं काम करीत असतानाच तिनं परमेश्वराची भक्‍ती केली. मोटेवरती अभंग म्हणणाऱ्या विठोबाला कधी कधी ती साथ करायची आणि चुकेल तेथे सुधारायची. नवऱ्याच्या पावलांवर पाऊल टाकून तिनं आयुष्य काढलं. खरोखरच ती महान पतिव्रता होती.

आपल्या अवतीभोवती जे रंगले गांजले आहेत त्यांना आपलं म्हणणारी ही सात्वीक स्त्री होती. दुसर्‍याचे सुख बघून तिला आनंद व्हायचा. आणि दु:ख दिसले तर तिला कणव यायची. अशा मातापित्यांच्या पोटीच महाराजांचा जन्म झाला. जिजाबाईला दिवस गेले असता तिला एक स्वप्न पडल ते असं.

आपण बाळंत व्हायला लागले आहे. प्रसुतीच्या वेदना भयंकर होत आहेत. शेजारी पाजारी लोक गप्प बसले आहेत. कदाचित मी मरणार असंच लोकांना वाटायला लागलं आहे. आपला पुढचा सोपा लोकांनी भरला आहे. वेदना होताच मी बेशुद्ध पडले आहे. काही वेळ हीच अवस्था त्यानंतर शुद्धीवर आले. सुईन म्हणाली झाली रिकामी पण ह्या पोरातून सारा प्रकाशच कसा निघतोय. पायाकडून आला म्हणून आईला फार ताप झाला.

भक्तहो महाराजांचा जन्म मातेला पडलेल्या स्वप्नाप्रमाणेच सन १९०५ साली झाला. सात-आठ वर्षानंतर बालदास महाराज सौते येथे शाळेस जाऊ लागले. लहानपणी त्यांना सारे लोक बाळू म्हणून बोलवत. साऱ्यांना महाराज हे प्रिय होते. महाराज शाळा शिकत असतानाच आईवडिलांना मदत करीत असत. रानात जाणं, भांगलणं, खुरपणं, मोट हाकणं, ऊसाचा पाला काढणं, ओझं आणणं… इत्यादी शेतीची कामं महाराज करायचे. सौते गाव म्हणजे एक ग्रामीण खेडेगाव तेथील मुलांना शेतीची कामं करणं भागच होतं. शेती हाच लोकांचा तेथील प्रमुख व्यवसाय. त्यामुळेच महाराजांना शेतीची कामं करणं अपरिहार्यच होतं.

महाराज ३री, ४थी पर्यंत शिकले तेथून पुढे शिक्षणाची सोय त्यांच्या सौते या गावी नव्हती, कदाचित सोय असतीच तर महाराज अधिक शिकलेही असते. शाळेत असताना एकदा घडलेली गम्मत अशी –

शाळेत बे चा पाढा शिकवायचं चाललं होतं. सर्व मुले गुरुजींच्या पाठीमागून पाढा म्हणत होती. पण महाराजांचे त्यावेळी त्या पाढयाकडे लक्ष नव्हते. त्यावेळी महाराज पाटीवर पेन्सिलीने श्रीराम श्रीराम असे लिहित बसले होते. त्यावेळी गुरुजी रागावून म्हणाले तुला शाळा शिकायची महत्त्वाची की देवाचा जप महत्त्वाचा ? त्यावेळी महाराज उत्तरले, मला दोन्हीही महत्त्वाचे आहे. या उत्तराने गुरुजी गप्पच झाले. या मुलाच्या जास्त नादी लागायला नको असे म्हणून म्हणाले काही हरकत नाही तुला दोन्हीही गोष्टी महत्वाच्या वाटतात ना? मग दोन्हीही गोष्टी एकाच वेळी शिक बाबा.

महाराजांनी आकर-बारा वर्षाच्या दरम्यान शाळेला रामराम ठोकला. महाराज जनावरे सांभाळण्याचे काम व शेतीचे काम करु लागले. कधी महाराज मोटेच्या मकराला पुस्तक बांधत आणि त्यातले अभंग पाठ करीत. एकदा तर त्यांनी अभंग गाथा मोटेच्या मकराला बांधलेली लोकांनी पाहिली होती. मोटेच्या नाडयावर पालथे पडून महाराज मोट हाणत असत. नाडयावर पालथे पडून पुढे जात असताना महाराज अभंग पाठ करीत असत व परत मकराजवळ आले की मकराला बांधलेल्या अभंगगाथेतील अभंग बघत असत. अभंगगाथा मकरालाच बांधलेली असायची. अशा प्रकारे महाराजांनी बालवयातच वाचनाचा सपाटा चालू केला.

महाराजांचे शिक्षण जरी कमी झाले होते तरी ते सुसंस्कृत होते. घरातील धार्मिक वागणूक, त्यागाचे शिक्षण, जनसेवेचा विडा, सामुदायिक पद्धतीचा घरात होणारा विठ्ठलाचा उत्सव, रामायण, महाभारत, ज्ञानेश्‍वरी, गाथा इत्यादी ग्रंथाचे श्रवण इत्यादीमुळे ते बहुश्रुत व सुसंस्कृत झाले होते.

जो जो जयाचा घेतला गुण
तो तो मी गुरु केला जाण
गुरुशी आले अपारपण
संपूर्ण जग गुरु दिसे!

हा दत्ताचा गुरुविषयी अनुभव होता. तोच त्यांच्या चित्तात बालपणापासून भरत चालला होता.

विवाह ठरला पण महाराज पसार

तरी झड झडोनी वहिला निघ (ज्ञा.म.)

महाराजांचे लग्न वयाच्या बाराव्या वर्षी ठरले. कारण त्या काळात लग्न हे मुलामुलींना कळावयच्या अगोदरच करण्याची प्रथा होती. काहीवेळा पाळण्यालाही बाशिंग बांधलं जात असे. समाजात रुढ असलेल्या चालीरीतीप्रमाणे महाराजांचं लग्न ठरविण्यात आलं.

रामदास निदान शुभमंगल सावधान ऐकून तरी बाहुल्यावरून पळून गेलेत पण आमचे महाराज येथपर्यंतही थांबू शकले नाहीत. लग्न ठरविल्याचे कळताच दुसऱ्या दिवशी काखेत अभंगगाथेची चोपडी मारुन सौते गावातून पळून पंढरपूरला गेले. तेथे सहा सात वर्षे राहिले. दिंडीर वनात एका भुयारात त्यांनी सहा सात वर्षे वास्तव्य केले. त्या भुयाराची कथा अशी.

तेथे एक राजा तपश्चर्या करुन नुकताच गेलेला होता त्या मोकळया झालेल्या भुयारात महाराज तपश्‍चर्या करु लागले. दिवसभर या गुहेत ते ध्यानस्थ बसत. सकाळी प्रातःविधी आटोपल्यावर ते माधुकरी (कोरे अन्न) मागून आणत आणि आणलेल्या शिध्यावर आपली उपजिविका करत असत. त्या भुयारात त्यांनी बसू नये म्हणून काही घटना घडल्या गेल्या

त्या अशा –

एकदा तेथे एक विंचू आला त्याचा नांगा मनगटासारखा मोठा होता. तो विंचू महाराजांच्या जवळपास फिरु लागला. त्या विंचवाला बघून महाराज म्हणाले देवा तू माझी परीक्षा बघतोस काय? मी मेलो तरी येथून निघून जाणार नाही.

दुसरी घटना अशी की एके दिवशी त्या गुहेत भला मोठा नाग फुस्कारा टाकत आला. महाराज जागचे हालले नाहीत. तो नाग आला आणि काही वेळानी निघून गेला. त्यावेळी महाराज म्हणाले परत येऊ नकोस बाबा! मी इथंच राहणार आहे.

तिसरी घटना अशी की अमावस्येच्या रातीला त्या भुयारावर बदाबदा दगडांचा वर्षाव झाला. महाराज तेव्हा देवाच्या आराधनेत होते. महाराज ध्यान मग्नतेतून थोडे बाजूला झाले. त्यांनी हा प्रकार समजून घेतला आणि म्हणाले, दगड कोसळू दे नाहीतर आकाश कोसळू दे मी येथून हलणार नाही.

सात वर्षाचा तपाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर महाराज पंढरपूरातून अनेक ठिकाणी फिरले. सोलापूरच्या रस्त्यावर असलेल्या पूलाखाली काही दिवस राहिले. चंद्रभागेच्या वाळवंटात काही काळ काढला. डोळे भरुन पंढरपूर पाहिलं. विठ्ठलाचं कडकडून मीठी मारुन त्यांनी अनेकदा दर्शन घेतलं.

पतितपावन! अशी त्यांनी विठ्ठलाला असंख्यवेळा हाक मारली. महाराजांनी आपल्या देहाचा गाभारा भक्‍तीनं तृप्त करुन घेतला. आपल्या हृदयरुपी मंदीरात विठ्ठलाची स्थापना करुन त्या मूर्तीवर आपल्या नितांत श्रद्धेचा अभिषेक करुन महाराज तृप्त बनले. सासरवाशिणीला माहेरात दिर्घकाळ राहिल्यावर जे सुख मिळतं तेच सुख आणि तेच समाधान महाराजांना पंढरपुरात पांडुरंगाच्या पावन नगरीत मिळाले.

महाराजांनी लहान वयात भुयारात वास्तव्य केलं. देवाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परमेश्वराची आढळ भक्‍ती करण्याचा निश्‍चय पत्करला. परमात्म्याच्या सत्य स्वरुपाकडे ध्यान देण्याचा प्रयत्न केला.

पंढरीतून सौते गावी परत

शरण शरण हनुमंता (तु. म.)

महाराजांनी दीर्घकाळ पंढरीत वास्तव्य केल्यानंतर महाराज सौते गावी परतले. सौते गावी आल्यानंतर ते हनुमानाच्या देवळात राहू लागले. त्याच देवळात रात्रंदिन देवध्यानात रमू लागले. काही लोक महाराजांना देवभक्तीच्या मार्गात लागल्यामुळे चांगले म्हणू लागले तर काही लोक त्यांची चेष्टा करु लागले. काही बहाद्दर म्हणू लागले “विठोबा केसऱ्याचं पोरगं पंढरीला राहून आलंया, कुठं कुठं भमक्या मारत फिरलंया आणि आता हनुमानाच्या देवळात बसलंया. बा नं लगीन करावयाचं ठरवलं होतं तोपर्यंत गेलं पळून. लेकाचा कशाला आलाय हया गावात तोंड घेऊन कुणास ठाऊक. जिकडं फुडा तिकडं मुलुख थोडा असं म्हणून बाहेर पडल्यालं पोरगं परत कशाला आलंया कुणास ठाऊक.”

काहींना मात्र महाराज पंढरीतून काहीतरी घेऊन आलेत याची जाणीव झाली होती. कारण महाराजांचे वागणे, बोलणे, ज्ञान या साऱ्यात फरक जाणवत होता. हनुमानाच्या देवळात महाराज ज्ञानेश्वरी अभंगगाथा या सारखे ग्रंथ वाचीत असत. काही वेळा अखंड पारायण करीत. अखंड पारायण म्हणजे काही दिवस खंड न पडता सतत वाचन करीत बसणे. ठरविलेला इच्छित भाग वाचन झाल्यानंतर मग थांबणे. अशा प्रकारचे छोटे छोटे उपक्रम हनुमानाच्या देवळात महाराज स्वतःच करु लागले.

हनुमानाच्या देवळात असताना महाराज रात्री अपरात्री केव्हाही देवळातून रानावनात जाऊन भटकत. त्यांना कसलीही भीती वाटत नसे. प्रकृती चांगलीच धडधाकट होती. पिंड एवढा गुटगुटीत होता की मारलेला दगडही परत टणकन पाठीमागे उडेल असा! गोफणीतला दगड जसा भिरभिरत पुढं पुढं धावतो तसेच महाराज या तरुणपणात पळायला लागले की भिरभिरतच त्या गोफणीतल्या दगडासारखेच सुटायचे. यावेळी कुणी त्यांना खुळसट म्हणायचे तर कुणी त्यांना वेगळयाच दिमाखात निरखून विचार करायचे. कुणी निंदा कुणी वंदा त्याचं महाराजांना काहीच वाटायचं नाही. अवतारी पुरुष हे असेच असतात. पण याची कल्पना काही अज्ञानी लोकांना नव्हती.

हनुमानाची पुजा महाराज पहाटेचीच करणार. पूजा पहाटेची करायची म्हणजे त्यापूर्वीच त्यांना पूजेच्या साहित्याची तयारी करणं भाग असायचं आणि नेमक्या त्या तयारीसाठीच महाराज रात्री दोनला उठायचेत. कडवी नदीच्या उदरात जाऊन आपले शरीर थंडावून यायचेत. आंघोळ करुन येतानाच वाटेतून पूजेचे साहित्य गोळा करीत यायचेत. साप, विंचू, भूतखेत… इत्यादी बाबी त्यांना काही माहितच नव्हत्या. या साऱ्या गोष्टी त्यांनी जणू काय पचवल्या होत्या. भीती हा शब्द त्यांच्या कोशात नव्हताच मुळी. काही वेळेला देवळात जाणारी म्हातारी माणसं महाराजांना म्हणायचीत, आरं बाळू तूला भीती कशी वाटत न्हाय रं? रातीचा मुलूखभर फिरतुयास वाटेल तिथं झोपतुयास. सटवीन पाचवी पुजताना तुझी त्या दिवशी भीती काढून नेलीया वाटतं. यावर हसत हसत महाराज म्हणायचे हे बघा ज्यानं घरदार सोडलं नि भक्तीचा मार्ग स्विकारला त्याला या जगात परमेश्वरा खेरीज कुणाचीच भीती नाही. महाराजांचे हे मार्मिक उत्तर ऐकले की म्हातारी कोतारी माणसं गप्प बसायची. तरीपण मनात म्हणायची कायतरी येडपट बोलतूय झालं.

हनुमान हा साऱ्या सौतेगावाचा प्रिय असणारा देव. या प्रिय देवाच्या पायाशी महाराजांचा पिंड दररोज पडू लागला. हनुमानाच्या देवळात राहणारं तरणंताटं पोरगं खरंच हनुमानासारखंच ताकदवान बनायला लागलं.

सदगुरु नेर्लेकर महाराजांचे सौते गावी आगमन

उध्दाराया आले दिन जना (ना.म.)

परमपूज्य जंगली महाराजांचे शिष्य सद्गुरु श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर हे गाईचा कळप घेऊन वारणेच्या काठची गावे आपल्या व गाईच्या पायांनी पावन करीत करीत सौते या गावी एके दिवशी आले. नेर्लेकर महाराज गावात आल्यानंतर साऱ्या गावात वार्ता घुमली – नेर्लेकर महाराज आलेत.

नेर्लेकर महाराज गावात आलेत. आल्यानंतर सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी गावास उपदेश केला. यावेळी महाराजांच्या उपदेशानं सारा गाव भारावून गेला. सद्गुरु नेर्लेकर महाराजांचा सर्वत्र जयजयकार होऊ लागला. या गोष्टीला आमचे बालदास महाराज अपवाद ठरले नाहीत. तेही या मेळाव्यात सहभागी झाले. हनुमानाच्या देवळातून बालदास महाराज बाहेर पडले आणि सद्‌गुरु श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर यांच्या समवेत सर्वत्र गावभर फिरु लागले. चुकलेल्या मुलाला आपली माय भेटल्यावर जो आनंद मिळतो तोच आनंद सद्गुरु नेर्लेकर महाराजांना भेटल्यावर आमच्या बालदास महाराजांना झाला. आमचे बालदास महाराज सद्गुरु सहवासात अगदी मंत्रमुग्ध झाले.

सारा सौते गाव सद्गुरु नेर्लेकर महाराजांच्या पाठीमागे का लागला या प्रश्‍नाचे उत्तर भक्तांनी जर ऐकले तर खरोखर त्यांच्या अंतरी आनंदी आनंद घडेल आणि तो आनंद मिळावा म्हणूनच मी येथे घडलेली सत्यकथा सांगणार आहे.

सौते गाव हा त्यावेळी कर्जानं गांजला होता. सारे लोक दुःखी आणि कष्टी होते. लोकांच्या विहिरींना पाणी नव्हते. उन्हाळयात तर पाण्याची फारच टंचाई भासत असे. अशा वेळी साऱ्या गावाचं दुःख बघून सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी साऱ्या गावाला तीन दिवसांचा उपवास सांगितला. गावात तराळानं दवंडी दिली.

ऐका हो ऐका, बाबांनो आपल्या गावाचं चांगलं होण्यासाठी साऱ्या लोकांनी आपापल्या जनावरांसह तीन दिवस उपवास करावा. हो बाबा हो!

साऱ्या सौते गावाच्या बायका पोरांनी उपवास केला. पुरुषांनी आपली जनावरे आपल्या सारखीच उपवाशी ठेवली. ऐवढेच नव्हे तर त्या दिवशी गाईला वासरु सुद्धा पाजले गेले नाही. एवढा खडतर उपवास साऱ्या सौते गावाने पाळला आणि खरोखरच याचा परिणाम म्हणून पुढे वर्षभरात तो गाव सुखी झाला. सारा गाव कर्ज मुक्‍त बनला. लोकांच्या विहीरींना पाणी लागले. सारा शिवार हिरवागार पिकांनी डोलू लागला. सद्गुरु नेर्लेकर महाराज त्या गावात आले आणि जाताना तेथे कायतरी देऊन गेले ही गोष्ट मात्र नक्की. ही सत्यघटना सारे म्हातारे लोक आजही सांगतात.

अशा या सद्गुरुंचा बालदास महाराजांच्यावर चांगलाच परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. म्हणून या प्रकरणात सारा सौतेगाव सद्गुरु नेर्लेकर महाराजांच्या पाठीमागे लागला असा मी उल्लेख केला आहे.

ज्यावेळी सारा समाज संकटात असतो अशा वेळी कुणी ना कुणी ज्ञानी समाजात अवतरतो. त्या समाजाचं तो ज्ञानी पुरुष दुःख नाहीसे करतो आणि अशावेळी सारा समाज त्या ज्ञानी पुरुषांच्या मागे धावतो. हा ज्ञानी पुरुष म्हणजेच तेजाचा तारा होय. सौते गाव कर्जाच्या संकटातून वाचवण्याचे महान कार्य सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी केले. दुःखी गावाला सुखाचे दिवस आले. सारा गाव भक्तीमार्गाकडे झुकला गेला. या साऱ्या गोष्टींचे कारण म्हणजे येथे सद्गुरु नेर्लेकर महाराज हे तेजस्वी ताऱ्याच्या रुपाने अवतरले. असे तेजाचे तारे ज्या ज्या वेळी महाराष्ट्रातील समाज संकटात सापडला गेला त्यावेळी महाराष्ट्राच्या भूमीत अवतरले आहेत. उदा:- ज्यावेळी सारा समाज वाईट आचार विचारांचे पालन करायला लागला होता त्यावेळी त्या समाजाला वाचवण्याचे कार्य पूज्य ज्ञानेश्‍वर महाराजांनी केले. समाजातील वाईट अशा आचारकांडाविरुद्ध ज्ञानेश्‍वरांनी बंड पुकारले आणि सारा समाज वाईट रुढी, वाईट परंपरा, वाईट चालिरीती इत्यादी पासून वाचविला. म्हणजेच समाजाच्या भल्यासाठी ज्ञानेश्वर माऊली अवतरली

सारांश असा की, सद्गुरु नेर्लेकर महाराजांच्या आगमनामुळे सौते गाव संकटमुक्त झाले. अशा अवतारी पुरुषाचा प्रभाव बालदास महाराजांच्या मनावर का पडणार नाही?

सदगुरु नेर्लेकर महाराजांनी सोपविली पशुपालन सेवा

भूतदया गायी पशूंचे पालन (तु. म.)

सदगुरु नेर्लेकर महाराज सौते गावी आले तेव्हा ते एकटे आले नाहीत तर त्यावेळी त्यांच्या बरोबर चाळीस गाई आणि चार बैलं होती. या साऱ्या जनावरांची व्यवस्था त्यांनी आमच्या बालदास महाराजांच्यावरती सोपवली होती. सौते गावी चाळीस खणांचे प्रचंड सपार (छप्पर) घालून त्यात या जनावरांची जोपासना करण्याचे काम आमचे महाराज करु लागले. सद्‌गुरुनी आपला हा चाळीस गाईंचा व चार बैलांचा गोतावळा का दिला होता ? हा प्रश्‍न भक्तांच्या मनात येणे साहजिकच आहे. याचे कारण सद्गुरुंचा महाराजांच्यावरती मोठा विश्‍वास बसला होता म्हणून…

बालदास महाराज चाळीस गाईंची व चार बैलांची सेवा करीत असत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एका व्यक्तीनं हे सारं करायचं म्हणजे केवढी अशक्य गोष्ट होय. चाळीस पेक्षा अधिक असणाऱ्या जनावरांचे दररोजचे शेण ४० पाटया किमान निघत असे. तेवढे शेण काढून गारीत (खड्डयात) टाकायचे म्हणजे सोपी गोष्ट नव्हे आणि हे काम त्यांनी कितीतरी दिवस केले. चव्वेचाळीस जनावरांचा कळप घेऊन महाराज बादयाच्या जंगलात दरारोज जायचे. बहिरीचे पठारावर वाचन करीत जनावरे राखायचे. बहिरीच्या पठारावर असलेल्या बहिरी देवा जवळ महाराज जैसे लहाणपणी बसत तसेच आताही तरुणपणी बसत. वाचन आणि पाठांतर यावर आता त्यांचा बराच भार होता. ज्ञानेश्वरी, भागवत, एकनाथी, रामायण, भक्तिविजय, हरिविजय पांडवप्रताप इत्यादी ग्रंथाचे वाचन महाराज मोठया आत्मियतेने करु लागले. त्यांनी आपला सारा जीव त्या ग्रथांच्या वाचनात गुंतवला होता. ग्रंथ हेच आपले गुरु असं ते सर्वांना बोलू लागले.

ग्रंथ अवलोकन येतसे मनुजा चातुर्य असे महाराज सर्वांना आवर्जुन सांगू लागले. हे सांगत असतानाच महाराज स्वत: या गोष्टींचे अनुकरण करीत असत. जंगलचा राजा असं महाराजांना काहीजण म्हणत असत. कारण सगळयांच्या अगोदर जंगलात पाय ठेवण्याचे काम महाराज करत आणि तेथून परत निघताना सर्वांच्या मागून जंगलाला रामराम करुन निघत. रात्र गावात आणि दिवस जंगलात असा त्यांचा नित्यक्रम बनला. जंगलातील बहूतांशी वनस्पती ते खात असत. ज्या ज्या वनस्पती जनावरे खातात त्या त्या वनस्पती बिनधास्तपणे खात असत.

जनावरांच्यासाठी महाराज ओढयाचे पाणी अधिक पसंत करीत असत. बादयाचा ओढा म्हणजे त्यांच्या गाई-बैलांचा आवडता ओढा. महाराजही याच ओढयाचं पाणी चांगलं समजत.
जनावरांच्या अंगावर ह्याच ओढयाचं पाणी महाराज चपाचपा मारत आणि त्यांचं शरीर चांदीगत चकाकून सोडत. महाराजांच्या बहुतेक सर्व गाई पांढऱ्या रंगाच्या आणि बैल ही तशीच पांढर्‍या रंगाची होती आणि नेमक्या याच कारणामुळं चांदीची बरोबरी करण्याचे सामर्थ्य त्या जनावरांच्या कातडीत होते.

उन्हाळयात ओढयाचे पाणी आटत असे अशावेळी महाराज त्या ओढयातील रांजून या ठिकाणी जनावरांना पाणी दाखवत असत. रांजून हे ठिकाण असे आहे की तेथे चोवीस तास पाणी
असे. तेथे पूर्वीच्या काळी भीमाने आपला गुडघा रुतवला होता अशी दंतकथा आहे. रांजून या ठिकाणाच्या पश्‍चिमेकडे धावटयाचे जंगल आहे. त्या जंगलातील जंगली जनावरे आजही रांजून या ठिकाणी पाणी पिण्यास येतात. रांजून या ठिकाणचे पाणी पांढरेशुभ्र असे कायमचे दिसते. पाणी थंडगार व मनाला एक आगळेच समाधान देणारे असे वाटते. पावसाळयात मात्र रांजून या ठिकाणचा कुंडा सारखा असणारा भाग पाण्याच्या प्रवाहात बुडून जातो. उन्हाळयात मात्र रांजून या ठिकाणचे खरे वैभव दिसते. सभोवती प्रचंड दगडांच्या मित्र परिवारात हे ठिकाण गुंगलेले दिसते. भोवतालची हिरवीगार सृष्टी या ठिकाणाकडे डोकावून जेव्हा बघते तेव्हाचा प्रसंग तर अनोखा वाटतो. दुपारच्या वेळी तर सूर्याला राहवत नाही म्हणून तो स्वतःच आपणाला त्या थंडगार रांजून या कुंडात बुडवून घेतो. सूर्याचे प्रतिबिंब जेव्हा त्या रांजून या कुंडात पडते तेव्हाचा प्रसंग देखावा अगदीच अविस्मरणीय वाटतो.

सुंदर ओढयाच्या रमणीय वातावरणात आमचे महाराज रात्र सोडली तर दिवसभर असत. महाराजांना निसर्ग फार प्रिय होता. निसर्ग तर बरच देतो असं महाराज म्हणत. विं. दा. करंदीकराच्या घेता या कवितेची येथे महाराजांच्या संदर्भात आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तर कविता अशी

देणाऱ्याने देत जावे | घेणाऱ्याने घेत जावे |
हिरव्या पिवळया माळावरुन | हिरवी पिवळी शाल घ्यावी |
सहयाद्रीच्या कडयाकडून | छातीसाठी ढाल घ्यावी |
वेडयापिशा ढगाकडून | वेडेपिसे आकार घ्यावे |
रक्‍ता मधल्या प्रश्‍नांसाठी | पृथ्वीकडून होकार घ्यावे |
उसळलेल्या दर्याकडून | पिसाळलेली आयाळ घ्यावी |
भरलेल्या भिमेकडून | तुकोबाची माळ घ्यावी |
देणाऱ्याने देत जावे | घेणाऱ्याने घेत जावे |
घेता घेता एक दिवस | देणाऱ्याचे हात घ्यावे |

या कवितेत कवीने जसा निसर्ग गुरु मानला आहे तसेच महाराज समजत. निसर्गाकडून दातृत्व हा गुण माणसानं घेतला पाहिजे. असं महाराजांचं मत होतं. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे महाराज निसर्गापासून धडे घेत होते. घेतलेले धडे दुसऱ्यांना सांगत होते. जनावरांचा एवढा कळप सांभाळण्यासाठी केवढी यातायात करावी लागली असेल याची कल्पना ज्यांच्या दावणीला जनावरे असतील त्यांनाच अधिक चांगली येईल. महाराज सातशे पेंडयांचा वाळक्या गवताचा भारा डोंगराच्या उतारावर असलेल्या एका प्रचंड दगडावरुन महाराज स्वतःच उचलून पाठीला लावत व डोंगर उतरुन खाली येत. सातशे पेंढयांचे वाळके गवत म्हणजे एक गाडी गवत होय. महाराजांनी एवढी प्रचंड ताकद कमावली होती.

उन्हाळयात महाराज जंगलात जाऊन सुमारे एक लाख गवत काढून ठेवत. तेवढे काढलेल गवत महाराज स्वतः सौते गावात आणून छपरात रचत आणि अशा प्रकारे पावसाळयाची सामग्री व्यवस्थित करीत असत. पावसाळयात त्यांना कधीही वैरण तोटा येत नव्हती. चव्वेचाळीस जनावरे वैरण खाऊन अंदाजे दहा वीस हजार गवत शिल्लक राहत असे. एवढा हा जनावरांचा परिवार महाराजांनी बिनतक्रार सांभाळला होता.

चार बैलांची चार नावे ठेवली होती, एका बैलाचे नाव राजा, दुसऱ्याचे नाव बाळया, तिसऱ्याचे नाव मदन आणि चौथ्या बैलाचे नाव सागर असे होते. सागर हा सागरा सारखा म्हणजे समुद्रासारखा प्रचंड पिंडाचा होता. राजा हा राजा सारखाच रस्त्याने डुलायचा. राजाची सारी ऐट आणि सारा बाणा त्याच्याकडे होता. बाळया हा बाळीसारखा स्वच्छ असायचा. मदन हा मधासारखा गोड होता. त्याची हालचाल मादक आणि मोहक अशीच होती.

साऱ्या जनावरांच्या कळपाची पुढारीन लक्ष्मी नावाची गाय होती. ती गाय वांझोटी होती. वांझ गाईला चांगलं समजलं जात नाही. तिच्या विषयी आदर असत नाही. पण महाराजांना ती गाय प्रिय होती. तिच्याकडे साऱ्यांचे पुढारीपण महाराजांनी बहाल केले होते आणि त्याचबरोबर त्या गायीचे नाव त्यांनी लक्ष्मी असेच ठेवले होते. कळपातील दुसर्‍या एका गायीचे नाव महाराजानी सोनी असे ठेवले होते. त्या गाईचे गुण सोन्या सारखेच महाराजांना वाटायचे. माझी सोनी फारच चांगली आहे. असाही कधी कधी महाराज आवर्जून उल्लेख करीत असत.

महाराज जनावरांच्या आत्म्यास देव मानत असत. आपला आत्मा आणि जनावरांचा आत्मा ते एकच मानत असत. रेडयामुखी वेद म्हणवणाऱ्या ज्ञानेश्‍वरी मऊलीचा उल्लेख महाराज कधी कधी या संदर्भात करीत असत. परमेश्‍वर हा सर्वांभूती पूरुन उरला आहे. याची जाणीव ते सर्वांना करुन देत. एखादी गाय आजारी पडली तर महाराज तिच्यावर लगेच झाडपाल्याचा उपाय करीत.

कुठल्यातरी झाडाची मुळी आणून उगाळून चारत. आयुर्वेदिक औषधांचे त्यांना थोडेफार म्हणण्यापेक्षा पुष्कळच चांगले ज्ञान होते. एकदा काय झालं सोनी गाय तापानं आजारी पडली. महाराज रात्रभर तिच्याजवळ बसून राहिले. हरणाचं शिंग गार पाण्यात दगडावर उगाळून त्याचा लेप तिच्या अंगावर देत महाराज उजडेपर्यंत बसले. दिवसानं डोगराच्या आडानं डोकावून बघताच सोनीला आराम पडला. महाराजांना आनंद वाटला. तोंड धुऊन नंतर महाराजांनी चहा घेतला. सकाळी छपरात येणाऱ्या प्रत्येका बरोबर महाराज तोंड भरुन आनंदाने बोलू लागले. गाईला आराम जणू काय गाईचा आराम नसून तो महाराजांचा स्वतःचाच होता असं भेटणाऱ्यांना वाटत होते.

महाराजांचा गोतावळा म्हणजे ही सारी जनावरं होती. साऱ्यांचे शेणमूत काढणे, साऱ्यांचे दुखणंभानं सांभाळणं, साऱ्यांच्या पोटाची व्यवस्था करणं, साऱ्यांच्या आवडी निवडी बघणे इत्यादी उठाठेवीतच महाराजांचा अहर्निश वेळ जायचा. या गोतावळया पलीकडे त्यांचं वेगळं असं जीवनच नव्हतं. अंत:करणात अध्यात्माचा गाभारा फुलत असतानाच महाराजांच्यावरती ही एक मोठी कामगिरी सदगुरु श्रीकृष्ण नेर्लेकर महाराजांनी सोपविली होती.

अनुग्रह

मग श्री गुरु आपैसा | भेटेचिगा (ज्ञा.म.)

सदगुरु नेर्लेकर महाराजांनी बालदास महाराजांची चांगलीच परीक्षा केली. चाळीस गाई आणि चार बैले सांभाळणारा हा आमचा खरा भक्‍त आहे. गोरक्षणाचे काम बालदास महाराजांनी फारच चांगले केले. अशा या श्रद्धावान भक्ताला आपण जवळच केले पाहिजे असे सद्गुरु नेर्लेकर महाराजांना वाटले.

सदगुरु नेर्लेकर महाराजांच्या जे जे मनात आले ते त्यांनी जनात केले. त्यांनी सौते गावी असणाऱ्या आमच्या बालदास महाराजांना दृष्टांत देऊन नेर्ले या गावी बोलविले. नेर्ले हे गाव सांगली जिल्हयात आहे. तिकडे महाराज दुसऱ्या दिवशी पायीच चालत गेले.

बालदास महाराज पायी चालत आलेले बघून सद्गुरु नेर्लेकर महाराज म्हणाले, अरे बाळू तू इतक्या लवकर कसा काय आलास?

बालदास महाराज चेहऱ्यावर स्मितहास्य प्रकट करीत म्हणाले, आपण दृष्टांत दिला म्हणून लवकर येणं भाग पडलं.

सदगुरु मान हालवून आणि हातवारे करुन म्हणाले, अरे बाबा कळले आता कळले मला.

बालदास महाराज सद्गुरुंच्या चरणाजवळ बसून सद्गुरुंना नमस्कार करुन म्हणाले, आपली काय आज्ञा आहे?

तुला मी अनुग्रह देणार आहे. अनुग्रह देणार आहे हे ऐकताच बालदास महाराजांना एकदम वेगळंच समाधान वाटलं. त्यांची सारी गात्रं प्रफुल्लीत झाली. त्यांच्या अंगावर आनंदाने शहारे आले. उमललेल्या फुलासारखा हसरा चेहरा करुन बालदास महाराज सद्‌गुरुंना म्हणाले, आज मला अनुग्रह हवाच आहे. चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो. चकोर पक्षी जसा चांदण्याची वाट पाहतो. तशीच मी आपल्या उपदेशाची वाट पाहत होतो. आपण मला अनुग्रह दयावा.

अरे बाबा, हा अनुग्रह कुणालाही देता येत नाही हा अनुग्रह घेण्यास ती व्यक्ती सर्वातोपरी पात्र असावी लागते. आमचे सोन्याचे शब्द आम्ही कुंपणात फेकले तर त्यांचा काय उपयोग? आता तुझी आध्यात्मिक ज्ञानाची बैठक तयार होऊ लागली आहे. तू माझ्या श्रद्धेला पात्र ठरला आहेस. हिच वेळ तुला अनुग्रह देण्याची आहे. आता अवधी करता येणार नाही.

नेलें गावच्या मठात बालदास महाराजांना सद्गुरुंनी अनुग्रह दिला. बालदास महाराज अनुग्रह दिल्यानंतर काही दिवस तेथेच आपल्या सद्गुरुंच्या सहवासात राहिले. सद्गुरुंनी त्यांना बराच उपदेश केला. गुरुशिष्यांनी परमार्थासंबंधी खूप चर्चा केली. विशेषतः सामान्य लोकांना संसार करुनही परमात्मा कसा साध्य करता येईल याचा ऊहापोह झाला. गुरु केल्यानंतर म्हणजेच अनुग्रह घेतल्यानंतर बालदास महाराजांची मुद्रा आनंदीत बनली.

मला मोगऱ्याचा वास भेटला, मला मोगऱ्याची संगत लाभली असे महाराज सर्वांना सांगू लागले. मला परमेश्‍वर भेटला, माझ्या चित्तातला आनंद फुलवणारा देव मला भेटला. मला ज्ञानाचा महासागर डुंबायला मिळाला. अशा प्रकारच्या अंत:करणातून येणाऱ्या ललकाऱ्या बालदास महाराज इतर जनांना सांगू लागले.

पंचाग्नी धूनी

याजसाठी जप, याजसाठी तप (तु.म.)

सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी पंचाग्नी धुनीचा कार्यक्रम अनेक ठिकाणी केला. बालदास महाराज या सर्व विधींना हजर होते. पडेल ते काम या विधींच्या वेळी बालदास महाराजांनी केले. हा पंचाग्नी धूनी म्हणजे चोहो बाजूस चार अग्नीकुंडे प्रज्वलीत करुन मध्यभागी स्वत: बसणे व सूर्याग्नी पाचवा.

पंचाग्नी विधी अनेक ठिकाणी भक्तीभावाने पार पडला. पहिला विधी हा सौते गावच्या बहिरीच्या पठारावर पार पडला. हे पठार सौते गावाच्या उत्तरेला आहे. या पठारावर बहिरी देवाचे देऊळ आहे. या ठिकाणीच या पंचाग्नी धुनीचा पहिला कार्यक्रम झाला. हा विधी बघण्यासाठी सारा गाव लुटला होता.

त्यानंतरचा दुसरा पंचाग्नी विधीचा कार्यक्रम सावर्डेच्या इंजाई देवीच्या समोर झाला. या विधीसाठी सावर्डेच्या आसपासचा भाग लुटला होता. मोठया भक्तीने आणि अंतरीच्या श्रद्धेने हा कार्यक्रम चांगलाच भारदस्तपणे पार पडला. म्हातारी कोतारी अनेक माणसं गाडया जुंपून हा आग्नीचा विधी पाहण्यासाठी आली होती. सारीकडे जत्रा फुलल्यागत माणसे जमली होती.

तिसरा पंचाग्नी धुनीचा कार्यक्रम वारण खोऱ्यातील साताळी या ठिकाणी झाला. हे साताळीचे पठार भेडसगावच्या उत्तरेस आहे. येथे विधी पाहण्यासाठी खूप भक्‍तगण होताच तरीपण तेथे एक विशेष घटना घडली. ऊसाच्या फडात काम करणारे चाळीस पन्नास फडकरी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी वेळात वेळ काढून रात्रीचे आले. ती वेळ भोजनाची होती. अशावेळी महाराजांनी सर्वांनाच जेवून जाण्याचा आग्रह केला तो सर्वांनी मान्य केला. सद्गुरु माऊलींच्या हातचे जेवण्यास सारेच उत्सुक बनले. सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी फक्त एक ओंजळभर तांदुळ एका छोटयाशा पातेल्यात शिजत ठेवले. थोडयाच वेळात भात तयार झाला. जेवण्यास बसा असे सद्गुरु नेर्लेकर महाराज म्हणताच सारेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. एक जण दुसऱ्याला हळूच म्हणला. अरे खंडू भात एवढासाच आणि आपण इतके लोक कसे जेवणार?

यावर पात्यालाकडे कानाडोळा करुन खंडू म्हणाला, अरे तसं बोलू नकोस, प्रसाद काय पोटभर खायचा नसतो. थोडा थोडा भात खाऊन (प्रसाद खाऊन) उठू.

सद्गुरुनी पाने वाढली. लोक जेवू लागले. जेवताना साऱ्यांचे लक्ष त्या भाताच्या पातेल्याकडेच होते. महाराज भात वाढतील तसा पातेल्यात परत होता तसाच भात असायचा. सारेजण पानावरच हात आकडून बसले. महाराज म्हणाले, अजून थोडा थोडा भात घ्या, त्यावर त्यातला म्होरक्‍या म्हणाला, आता काय जेवायचं कप्पाळ काय? आमचं पोट फुटायला झालंय. आम्हाला आता पानावरुन उठायची परवानगी दया. महाराज म्हणाले, तुमची इच्छा.

सारे फडकरी पानावरुन उठले. महाराजांना साष्टांग दंडवत घालून परत आपल्या ऊसाच्या फडात कामाला गेले. हा प्रसंग वाचल्यानंतर सामान्य माणसाला वाटेल की महाराजांच्या पातेल्यात परत परत भात कसा तयार झाला. मोठया योग्यांना हया गोष्टी योगसिद्धीद्वारे साध्य होऊ शकतात. महान योग्यापुढे पंचमहाभूते लीन होतात. संत तुकाराम महाराज म्हणतात.

असाध्य ते साध्य / करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे.

चौथा पंचाग्नी धूनीचा कार्यक्रम उदगिरी या ठिकाणी झाला. उदगिरी हे ठिकाण किर्र झाडीत आहे. या ठिकाणचा निसर्ग रम्य आहे. भोवताली असलेल्या करवंदीच्या जाळींना साक्ष ठेवून भक्तगणांच्या समवेत येथला विधी पार पडला. या विधीच्या वेळी सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी दगडाला पाझर फोडून दाखविला. सारा भक्‍तगण चकित झाला.

पाचवा पंचाग्नी धुनीचा कार्यक्रम विशाळगडाच्या पायथ्याशी झाला. विधीच्या वेळी बालदास महाराजांना सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी सौते गावी जाऊन रातोरात गाईचे दुध आणण्यास सांगितले.

विशाळगड ते सौते अंतर ४० कि.मी. आहे. ऐवढे अंतर तोडून महाराज गायीचे दूध घेऊन दोन ते अडीच तासात परत आले. रात्रीचे जाताना विशाळगडाच्या अलिकडे वाटेत एक ढाण्या वाघ बसला होता. बाजूने जाण्यास मुळीच रस्ता नव्हता तरीपण बालदास महाराज त्या वाघाला न भीता त्याच्या जवळून निघून गेले. वाघाने त्यांना काहीही केले नाही. अशा प्रकारे वाघाच्या तावडीतून गायीचे दूध घेऊन बालदास महाराज विशाळगडाच्या पायथ्याला पोचले. सद्गुरु नेर्लेकर महाराजांच्या सहवासात असणारे सारे भक्तगण आश्‍चर्य चकीत झाले. बालदास महाराजांच्या चालण्याच्या वेगाचे आणि जंगलातून येण्याच्या धाडसाचे त्यांना नवल वाटले.

सुळकीच्या डोंगरावर नामसप्ताह साजरा

करील ते काय नोहे महाराज (तु.म.)

पंचाग्नी विधीची साधना झाल्यानंतर सद्गुरु नेर्लेकर महाराज नेर्ले गावाच्या पश्‍चिमेला असलेल्या सुळकीच्या डोंगरावर सप्ताह साजरा करण्यास आले. सप्ताहाच्या समाप्तीच्या वेळी खिरीचा प्रसाद करण्यात आला होता. या प्रसादासाठी बालदास महाराजांनी नेर्ले गावातून मोठी काईल आपल्या डोक्यावरुन सुळकीच्या डोंगरावर स्वत:नेली होती. त्यांची ती प्रचंड ताकद बघून भक्तगण अचंबित झाला होता.

खिरीचा प्रसाद जमलेल्या लोकांना पोटभर वाढण्यात आला होता. हजारो लोकांनी तो प्रसाद मिटक्या मारत भक्षण केला. जमलेल्या भक्तांची संख्या इतकी होती की, आणलेल्या प्रत्रावळया अपुऱ्या पडल्या. शेवटी काही भक्तांना दगडावर खिरीचा प्रसाद वाढण्यात आला. तेथे असलेल्या जांभा दगडावर भक्तांनी तो प्रसाद खाल्ला. जांभा दगड हेच पात्र समजून त्यावर भक्तांनी खिरीचा प्रसाद घेतला. जमलेल्या जनसमुदायास केलेली खीर संपली नाही. राहिलेली खीर बालदास महाराजांनी स्वतः बैलाची गाडी जुंपून कृष्णा नदीच्या ढोहात ओतली. कृष्णा नदीतील माशांनी व इतर जलचर प्राण्यांनी त्या प्रसादाचा लाभ घेतला.

मठाचा प्रारंभ पण मध्येच तीर्थयात्रा चालू

तव तू आपूले स्वहित लाहे । तीर्थ यात्रे जाय चुको नको (ए.म.)

सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी सारा सौते गाव कर्जमुक्त होईल असे सांगितले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांना विचारले.

तसं घडलं तर आम्ही आपली आठवण म्हणून काय करु ? त्यावर सदगुरू नेर्लेकर महाराज म्हणाले, जे चिरकाल टिकेल असे काय पण करा.

या सद्गुरुंच्या म्हणण्यानुसार साऱ्या गावकऱ्यांनी सौते गावी मठ बांधण्याचे ठरविले. या मठाला देणगी मठ सौते असे नाव देण्याचे ठरले. या मठाचा पाया सद्गुरु नेर्लेकर महाराजांच्या हस्तेच घालण्यात आला. पाया भरुन काढला. पाया भरणीचे काम फारच झपाटयाने झाले. नंतर मात्र हे काम रखडत पडले. मठाचे काम तसेच अपुरे असताना सद्गुरु नेर्लेकर महाराज तिर्थयात्रा करण्यास निघाले. त्यांनी बालदास महाराजांना आपल्या बरोबर घेतले. यावेळी बालदास महाराजांनी आपल्याकडील गाई व बैल जे जे भक्‍त त्यांचा चांगला सांभाळ करतील असे वाटले त्यांना त्यांना त्यांचे वाटप करुन दिले. ज्यांनी ज्यांनी जनावरे नेली त्यांनी त्यांचा चांगला सांभाळ करण्याचे वचन बालदास महाराजांना दिले.

आपल्या आयुष्यातील ही अखेरचीच तीर्थयात्रा या हेतूनेच सद्गुरु श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर नेर्ले गावच्या मठातून बाहेर पडले. इ.स. १९३२ मध्ये बालदास महाराज व इतर शिष्यगणांसह नेर्लेकर महाराज तीर्थयात्रेस निघाले होते. बालदास महाराजांना त्यांनी खास बोलावून घेतले होते. बालदास महाराज ही त्यांच्या समवेत म्हणजे गुरु समवेत जाण्यास हारकून गेले. त्यांनी नेर्ले गावी जाऊन आपल्या गुरुचे पाय धरले. आणि आपली काय आज्ञा? असे विचारले त्यावेळी अतःकरणात नितांत प्रेम आणि डोळयांत साठलेल्या आत्यांतिक आदराने सदगुरू शिष्याला म्हणाले, बाळू, तू माझ्या बरोबर तीर्थयात्रेला चलावेस अशी माझी इच्छा आहे. मी आता माझा देह ठेवणार आहे. तत्पूर्वी ही मला माझी अखेरची तीर्थयात्रा करावयाची आहे. बालदास महाराज आनंदी स्वराने म्हणाले.

आपण द्याल ती आज्ञा पाळण्यास मी तयार आहे. आपण कोणत्या क्षणी बाहेर पडायचे ते बोला. यावर टवटवीत मुद्रेने सदगुरू नेर्लेकर महाराज म्हणाले,

अरे बाबा उद्‌यालाच निघूया आपणाला वेळ आणि काळाचे बंधन कसले. सदगुरू नेर्लेकर महाराज आपल्या शिष्यगणांसह निघाले. बालदास महाराज हे सदगुरुंचे फारच आवडते शिष्य होते. गुरुंनी बोलावे आणि शिष्याने झेलावे अशी त्या दोघांची अवस्था होती. त्यामुळे प्रवासात सदगुरू हाच त्यांनी प्राण समजला होता.

प्रथमतः सद्गुरु नेर्लेकर महाराज पुण्याला आपल्या शिष्यगणांसह आले. तेथे त्यांनी प्रथम आपल्या गुरुंच्या समाधीचे दर्शन घेतले. आणि तेथून पुढे प्रवासाचा प्रारंभ करते झाले, म्हणजे परमपूज्य जंगली महाराजांच्या पायाने पवित्र झालेल्या पुण्यापासूनच त्यांच्या तीर्थयात्रेचा खरा प्रारंभ झाला. तेथून पुढे देहू, आळंदी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, मुंबई या मार्गाने गुजराज मध्ये गेले व डाकुरजी, राजकोट ते गिरणार पर्वत येथपर्यंत तेथून सूदामपुरी, मूळ द्वारका, भेट द्वारका, गोपी तलाव ते कच्छ भोज, मांडवी कराची अबुचा पहाड, दिल्ली, हरिद्वार, ऋषिकेश, देवप्रयाग, टेहरी गडवाल तेथून धरासु गंगनी जमुना चट्टी, हणमंत चट्टी, मार्तंडी तीर्थ, यमुना उगम, उत्तर काशी, डोली तलाब, कल्हारी, लोहारी नाग, भैरी घाट, गंगात्री मरवाना, वृद्ध केदार त्रिजोगी नारायण, गौरीकुंड, सोनप्रयाग, केदारनाथ, गुप्तकाशी चंद्रपुरी, वनियाकुंड, अरवी मठ, कमलेश्वर महादेव, तुंगनाथ, रुद्रनाथ, गोपीश्वर, चमोवली तेथून ते पिंजळ कोटी, विष्णूप्रयाग गोविंद घाट आणि शेषधारा येथे आले. येथ पर्यंतच्या प्रवासात सद्गुरु नेर्लेकर महाराज जेवढे उत्साही होते तेवढेच उत्साही बालदास महाराज हेही होते. सदगुरूंची विशेष सेवा बालदास महाराजांनी शेषधारा या ठिकाणी केली. आराम करतेवेळी पाय दाबण्यापासून ते आंघोळी करीपर्यंत भक्तिभावाने ओथंबलेली सेवा सदगुरूंची बालदास महाराजांनी केली. या वेळी सदगुरू नेर्लेकर महाराज बालदास महाराजांना म्हणाले,

बाळ तू माझी सेवा फार करतोस, मला काय हवं आणि काय नको हे तूच जाणू शकतोस. तुझ्या अंतरी वसत असलेले शुद्धतेचे भाव माझ्या डोळयांना तोषवित आहेत आणि माझ्या अंतरी होणारा आनंद तुझ्याही अंतकरणात उचमळताना दिसत आहे. यावेळी बालदास महाराज म्हणाले, आई – वडिल – सदगुरू आणि परमेश्वर यांच्यापेक्षा, या जगात काय मोठं आहे ? साऱ्या जगाची किंमत यांच्या पुढं फिकीच आहे.

अशीही गुरुशिष्याची शाब्दिक चर्चा झाली. यानंतर परत पुढचा प्रवास चालू झाला.

पांडुकेसर, जोतीमठ, हणमंत स्थान, बद्रीनाथ, अलकनंदा, सरस्वती संगम, वसुधारा, सुवर्ण रोहन लोकपाल, हेमकुंड, भविष्यबद्री, चमेली घाट, नंद प्रयाग, कर्णप्रयाग, श्रीनगर शिवानंदी, गुलाबराही, नगरकोटा, आधिभद्री, जोकापणी, धुनार घाट, दुसरा वृद्धकेदार, रामनगर, कोटकार काशी, बनारस, अयोध्या, गयापूर व जगन्नाथपूरी.

जगन्नाथपूरी येथे सद्‌गुरु नेर्लेकर महाराजांनी तेथून पुढचा प्रवास बालदास महाराजांच्या बरोबर चर्चा करुन आखला. इतर शिष्यगणांबरोबर चर्चा केलीच पण विशेषतः बालदास महाराजांच्या बरोबर चर्चा उपचर्चा करुनच मद्रास द. यात्रा आखली.

तो प्रवास असा-

मनमद्रा, विनमद्रा, सखी गोपाळ पक्षतीर्थ शिवकांची, विष्णुकांची, कार्तिकस्वामी, रामेश्वर, धणुष्यकोटी, विजवाडा, गोदावरी, किसकिंदा गानगापूर आणि पंढरपुर अशा अनेक पवित्र स्थळांना भेटी देऊन जवळ जवळ आठ महिन्यांनी महाराज आपल्या नेलें या गावी आले. यावेळी सद्गुरुंच्या चर्येवर एक वेगळेच तेज तळपताना बालदास महाराजांना दिसले. त्यांनी सारी काया बदलून नविन देह धारण केल्याची स्पष्ट जाणीव बालदास महाराजांना झाली.

उत्तरखंडातील तीर्थयात्रेचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर सद्गुरु नेर्लेकर महाराज हे आपल्याच गावी म्हणजे नेर्लेगावच्या मठात राहिले आणि बालदास महाराज आपल्या सौते गावी परत आले. सौते गावी परत आल्यानंतर महाराज प्रवासाचा अनुभव इतरांना सांगू लागले.

सद्‌गुरुंची सेवा

आघवियाची दैवा | जन्मभूमी हे सेवा || (ज्ञा.म.)

हिंदुस्थानची पदयात्रा करुन आल्यावर सदगुरू नेर्लेकर महाराज हे नेर्ले गावच्या मठात तपश्चर्या करीत थांबले. त्यांची प्रकृती आता थोडी थकू लागली होती. तरीपण योगासने करणे समाधी लावणे आणि उतरविणे.. इत्यादी योगी पुरुषाला आवश्यक अशा गोष्टी करणं नित्यनियमानं चालू होतंच.

बालदास महाराज यांना बोलावून सदगुरूंनी सांगितले.

थोडयाच दिवसांचा मी तुझा सोबती आहे. मला माझ्या ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणं पुढं वाटचाल करणं भागचं आहे. हे ऐकताच बालदास महाराजांचे डोळे पाण्याने भरले. वळवाचा पाऊस जसा पटकन बदाबदा पडतो अगदी तसंच बालदास महाराज घळाघळा रडू लागले. आपल्या सद्गुरुंनी आपणाला सोडून जावं असं कुणा शिष्याला वाटल काय? बालदास महाराज कावरेबावरे झाले. क्षणभर भांबावूनच गेले त्यांना काहीही सूचेनासं झालं. नंतर भरलेल्या अंतःकरणानं शिष्य सद्गुरुंना म्हणाले,

महाराज तुम्ही माझे गावी चला आणि तेथेच तुमचा पवित्र देह ठेवा. महाराज माझी हिच शेवटची इच्छा आपल्या चरणी आहे. तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करावी. त्यावर वेगळेच तेज चेहऱ्यावर संचारलेले महाराज म्हणाले,

अरे असं का बोलतोस? तू आणि मी दोन आहोत काय? तू म्हणजेच मी आहे आणि मी म्हणजेच तू आहेस.

या बोलण्यानंतर बालदास महाराज त्यांच्या जवळ कायमच बसून राहिले. एक क्षणही वाया न घालविता बालदास महाराज आपल्या गुरुंची सेवा करु लागले. गुरुंच्या चरणावर सारखे हात फिरवू लागले. छातीला कान लावून हृदयाचे बोल ऐकू लागले.

कधी लहर आलीच तर गुरु बालदास महाराजांना आपली सुख-स्वप्ने सांगत. मध्येच थांबून गुरु, कर्तव्याची जाणीव करुन देत. ऐकत असताना बालदास महाराज समाधानी होत. पण आपला देव – आपला गुरु – आपलं सर्वस्व आपल्या सानिध्यातून दूर जाणार याचा त्यांना विसर पडणे कदापिही शक्‍य नव्हते. आपल्या गुरुंच्या गमनाची अंतःकरणात क्षणभर आठवण झाली तर बालदास महाराजांना गहीवर यायचा. गुरुंची नजर त्यांच्या नजरेला भिडली, की त्यांच्या डोळयातील अश्रू पटकन खाली टिपकून नेत्रमंदीर खुले करायचे. परत त्या मंदीरात गुरुंची मूर्ती अधिष्ठित व्हायची.

बालदास महाराजांच्या अंतरीचं दुःख जाणून सद्गुरु म्हणाले. बाळू, हा मानवाचा देह फार किंमतीचा आहे. या जन्मी त्याची किंमत फार कमी लोकांना कळते. ज्याचा देह विधात्याच्या कसोटीला उतरतो. तो धन्य होतो. बाळू हे तू जाणून घे. तुझ्यातच मी सामावलो आहे हे सांगूनही तू का दुःखी दिसतोस? यानंतर बालदास महाराजांना गप्पच बसणे भाग पडले. थोडंस थांबून बालदास महाराज सद्गुरुंना म्हणाले,

मी आपणासाठी आपल्या पश्‍चात काय करु?

बाळू तुझी इच्छा असेल तर माझी आठवण म्हणून तू माझी समाधी बांध. गुरुच्या चेहऱ्यावरचे अखेरचेच भाव आहेत हे जाणून घेऊन बालदास महाराज म्हणाले,

सद्गुरु आपणाला वचन देतो की आपली समाधी बांधून मी आपली इच्छा पूर्ण करीन आणि परमेश्वराच्या नामस्मरणाचा मंत्र सामान्य माणसांपर्यंत पोचवीन.

हे बालदास महाराजांचे वचन ऐकून गुरुंच्या श्रुती धन्य झाल्या.

१९४७ साली कार्तिक वद्य (कृष्ण पक्षाचा दिवस) एकादशी वार सोमवार या दिवशी बालदास महाराजांचे गुरु समाधीस्त झाले. पद्यासनावर समाधीस्त झालेली ती सगुण मूर्ती बघण्यासाठी नेर्ले गाव व आजूबाजूचा परिसर लुटला होता. साऱ्या स्त्री-पुरुषांनी ती मूर्ती डोळे भरुन पाहिली. सर्वांचे नेत्र कृतार्थ झाले. याचवेळी बालदास महाराज त्या मूर्तीला कवटाळून उभे होते. बालदास महाराजांच्या डोळयातून घळाघळा पाण्याचा प्रवाह वाहत होता. नेत्रातून वाहणाऱ्या गंगेनं गुरुच्या मस्तकावर वर्षाव चालू केला होता. गुरुंचे सारे अंग न्हाऊन निघाले होते. गुरुंना दिलेल्या वचनांची पूर्ती तत्क्षणी पूरी केली. बांधलेल्या समाधी भोवती धूप घुमू लागला. दिपांच्या सोनेरी प्रकाशात समधी उजळून निघू लागली. चंदनाच्या सडयात समाधी तृप्त झाली. समाधीच्या लगतचा पाच-दहा फुटांची जागाही चंदनाच्या वासानं न्हाऊन निघाली. समाधीवर चांदीच्या पादुका ठेवण्यात आल्या आणि त्या पादुकांच्या वरती बालदास महाराज आपले नयनातील प्रेमाश्रु ढाळीत बसले.

कापशीच्या मठातून महाराजांचे स्थलांतर

सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा | (तु.म.)

कापशी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर येथील मठाचे बांधकाम दासचंद महाराज यांनी सुरु केले. त्यावेळी त्यांच्या समवेत बालदास महाराज व बंडू महाराज हे दोघेजण होते. या तिघांचे एकमेकांवर बंधुभावाचे प्रेम होते. दासचंद महाराज यांना बालदास महाराज व बंडू महाराज हे दोघेजण वडीलबंधू मानत असल्यामुळे त्यांनी जे सांगितले ते ते बालदास महाराजांनी ऐकले.

बालदास महाराज हे भिक्षा मागून आणत असत. दासचंद महाराज स्वयंपाकात असत. बालदास महाराजांना दासचंद महाराज जेवढी घरं मागण्यास सांगतिल तेवढीच घरे बालदास महाराज मागून येत असत.

दासचंद बाबा बंडू महाराज व बालदास महाराज हे तिघेजण एकत्र तीस वर्षे राहिले.

या तीस वर्षाच्या कालावधीत बालदास महाराज हे अध्यात्म ज्ञानाचा अभ्यास करीत होतेच आणि त्याचबरोबर अनेक भारतीय धार्मिक ग्रंथांचे वाचनही करीत होते. आपल्या भारतीय सर्व धार्मिक ग्रंथांचा अभ्यास या कालावधीत बालदास महाराजांनी केला आणि केवळ अभ्यासात लक्ष केंद्रीत न करता इतरही सामाजिक व धार्मिक क्षेत्रे निर्माण करण्यातही त्यांनी लक्ष दिले. याच कालावधीत कापशीचा मठ बांधण्याचे काम चालू झाले.

दासचंद महाराजांच्या हुकूमाप्रमाणे बालदास महाराज कापशीच्या मठाचे काम बघत होते. बालदास महाराज, बंडु महाराज या दोघांनी दासचंद बाबाचा शब्द झेलून या मठाचे बांधकाम सांभाळले. मदत गोळा करणे व शारीरीक कष्ट या सर्वच गोष्टी बंडू महाराज व बालदास महाराज यांनी केल्या. या मठाच्या बांधकामात बंडू महाराज व बालदास महाराज यांचा वाटा सिंहाचा समजावा लागेल.

बालदास महाराजांनी या मठाच्या कामात घेतलेले परिश्रम फारच मोलाचे आहेत. हा मठ पूर्ण झाल्यानंतर या तिघा गुरुबंधूंना किती आनंद झाला म्हणून सांगू! एखादं महत्वाचं काम हाती घेतल्यानंतर आणि त्या कामात अनेक अडचणी आल्यानंतरही ते काम पूर्ण झाल्यावर जो आनंद व्यक्तीला होतो तोच आनंद बालदास महाराजांना झाला. कापशीचा मठ पूर्ण झाल्यानंतर आपण काय कष्ट केले याची माहिती बालदास महाराज आपल्या संगतीतील इतर भक्तांना सांगत असत. पण म्हणतात ना “आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना” याप्रमाणे बालदास महाराजांनी कापशीचा मठ सोडला.

महाराजांचा अन्न त्याग

विवेका सहित वैराग्याचे बळ | धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा || (तु. म.)

कापशी येथे असतानाच महाराजांनी अन्न त्यागाचा निश्‍चय केला. आपण अन्न न खाताही जगू शकतो हे त्यांनी सर्वांना दाखवून दिले. कापशी येथे केलेला अन्न त्यागाचा निश्‍चय त्यांनी देह ठेवीपर्यंत पाळला. यावरुन त्यांच्या स्वभावाची व त्यांच्या सामर्थ्याची प्रचीती लक्षात येते. हे येऱ्यागबाळयाचे काम नाही तर तेथे जातीचेच हवे – असेच म्हणावे लागेल.

बालदास महाराज अन्न खात नव्हते. मग ते काय खात होते ? महाराज फक्त लिंबाचा, निगडीचा व इतर पाला कच्चा किंवा शिजवून खात होते. त्यात काही वेळा मीठ घालत असत. तर काही वेळा बिन मीठाचा खात असत. झाडांचा पाला हाच महाराजांच्या जगण्याचे साधन होते.

बालदास महाराजांनी ४१ वर्षे अन्नाचा त्याग केला. शास्त्राप्रमाणे माणसाला सर्व जीवनसत्वे व सर्व घटकद्रव्ये आवश्यक असतात. पण हा नियम प. पूज्य बालदास महाराजांना लागू पडला नाही. कारण बालदास महाराज हे प्रति परमेश्‍वर होते. महाराज ४१ वर्षे अन्नाचा त्याग करून जगले. मग हा अलौकिक सामर्थ्याचा संत नव्हे काय ?

दहा ते बारा वर्षे महाराज अंथरुणावरच पडून होते. त्यावेळी त्यांची सेवा भक्‍तगणच कारीत असे. या कालावधीतही महाराजांनी अन्नाला स्पर्श केला नाही. त्यांची सेवा करणारे भक्‍त अदयाप जीवंत आहेत. त्यांचा अनुभव भाविकांनी येऊन ऐकण्यासारखाच आहे. १९३५ साली अन्नाचा त्याग करणारे महाराज १९७५ सालापर्यंत जगले कसे ? या प्रश्‍नाचे उत्तर असे की येथे सगळे शास्त्रीय नियम अपुरे पडतात. ज्यांनी अनुभव घेतला त्याच भक्तांना ते कळणार. ज्यांनी अनुभव घेतलाच नाही त्यांना काही कळणार नाही. कदाचित मी लिहिलेले सत्यही वाटणार नाही. पण लिहिताना मी माझ्या प्रामाणिकपणाशी बेईमानी न करता जे सत्य आहे तेच भक्तापुढे समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सौते मठाचे काम पूर्ण

सत्य संकत्पाचा दाता नारायण | सर्वकरी पूर्ण मनोरथ || (तु.म.)

सौते मठाचे काम बंद पडले होत. ते बांधकाम चालू असताना म्हणा किंवा बंद पडले असताना म्हणा बालदास महाराज गुरुंच्या इच्छेनुसार तीर्थक्षेत्रांना गेले. त्यामुळे इकडे मठाचा पसारा तसाच पडून राहिला. बांधकामाचा पुढाकार घेणारे सत्पुरुष जर तेथे नव्हते तर मग तो भार कोणी उचलावा?

बालदास महाराजांनी रातीचा दिवस करुन सौते मठाच्या कामाला सुरुवात केली. अनेक लोकांच्या गाठी भेटी घेऊन अपुरे बांधकाम पुरे करण्याचा चंग बांधला. स्वतः पाटया भरुन वाळू-सिमेंट दिले. भींतीवर रचण्यासाठी दगडे उचलून गवंडयांना बांधकामात मदत केली. महाराज कामाला लागले की दहा गडयांचे काम एकटेच भराभरा करत असत. रात्रीचे काम करताना महाराज बत्तीचा आणि प्रसंगी दिवटिचा उपयोग करत असत. मठाचे काम चांगले करण्यासाठी ते गवंडयांना म्हणत,

अरे हे देवाचं काम आहे. यात काय खायाचं बघू नकोस. आळस करुन वेळ काढू नकोस. जे करायचं ते नीतीनं आणि प्रामणिकपणानं कर. तू जर हे देवाचं मंदिर चांगलं बांधलस तर हया जगात तुझं कोणीही वाईट करणार नाही. आपण कोणताही धंदा करीत असो त्या धंदयात आपण प्रामाणिकपणे वागलेच पाहिजे.

हे सदगुरू बालदास महाराजांचे बोल ऐकून गवंडी म्हणत असे, होय महाराज कुठं कसं वागावं आणि कुठं कसं दिवस बेरजेला काढावं हे आम्हाला काय कळत नाही होय. तुम्ही जीवाचा आटापिटा करुन हे कशाला करताय, हे काय आम्हाला कळत नाही होय.

महाराज परत हसत म्हणायचे, आरं माणसाला हया जगात सारंच कळत असतं पण वळत नाही. हयाला उपाय काय ? तु सांग की रं बाबा लबाड बोलू नये हे प्रत्येकाला पटतं पण किती लोक खरं बोलतात ? राग मानू नकोस, आपले म्होरं बघून कामाला सपाटा लाव बघू.

असं शाब्दिक चपकारे ऐकून मग गवंडी नव्या जोमानं कामाला लागायचा. महाराजही हसत हसत लागेल ती मदत गवंडयांना करायचे.

बालदास महाराजांनी फार परिश्रम घेऊन सौते गावचा मठ बांधला. गावच्या लोकांनीही त्यांना चांगलेच सहाय्य केले. साऱ्यांच्या प्रयत्नांचे फळ म्हणून सौते गावाचा मठ तयार झाला. हा मठ इ.स. १९५० साली पूर्ण झाला.

मठ पूर्ण झाल्यानंतर साऱ्या भागातील लोकांना फार आनंद झाला. तो मठ म्हणजे सर्व गावचे व परिसराचे तीर्थक्षेत्र बनला. त्या मठातच आपले सद्गुरु प. पूज्य श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर यांचा फोटो व पादुका बालदास महाराजांनी पुजण्यास प्रारंभ केला. भजन-पूजन-वाचन इ. धार्मिक विधींनी तो मठाचा गाभारा घुमु लागला. अध्यात्म ज्ञानाच्या चर्चा तेथे होऊ लागल्या. स्वर्गीय सुखाचा अनुभव तेथे बालदास महाराजांच्या सहवासातील भक्तांना मिळू लागला.

श्री. गुरु मूर्ती स्थापना

“ब्रम्ह मूर्ती संत” (जा.म.)

सौते गावच्या मठाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बालदास महाराजांनी त्या मठात प्रथम गुरुंची मूर्ती बसविण्याचे ठरविले. या संदर्भात महाराजांनी आपल्या आवडत्या भक्ताला विचारले, “मी मठात माझ्या गुरुंची मूर्ती बसविण्याचा विचार केला आहे.” यावर आनंदीत मुद्रेने भक्‍त म्हणाला, “फारच छान! आपण मूर्ती कशाची बसवणार “म्हणजे तुला काय म्हणांयचे?” असे महाराज म्हणाले. भक्ताला वाटले की आपल्या प्रश्‍नांचा महाराजांना राग आला म्हणून भक्‍त हात जोडून म्हणाला,

“आपण जी गुरुंची मूर्ती बसविणार ती कोणत्या प्रकाची असणार ? म्हणजे ती गारेची, शाडुची, दगडाची की संगमरवरी असणार?”

यावर महाराज म्हणाले “राजस्थान या ठिकाणी जाऊन संगमरवरी मूर्ती आणण्यांचा मानस आहे. पैशाची थोडी जमवा जमव करावी लागेल.”

आवडता भक्त म्हणाला.
“आपण मागाल ते आम्हा भक्तांकडे मिळेल. तुमच्या शब्दासाठी आम्ही सर्वस्वाचा त्याग करु. आपण त्याचा विचारच करु नका”
महाराज म्हणाले,
“ठीक तर, मग केव्हा जाऊ या?”
“आपण म्हणाल तेव्हा.”
कोणत्या ठिकाणाहून मूर्ती आणायची?”
“अरे बाबा, ते तर मगाशीच सांगितले आहे की, मला वाटतं की तुझ्या मनात पैशांचा विचार चालू असावा. त्यामुळेच मूळ मुद्दा विसरलास वाटतं.”
“होय महाराज आपलंच खर आहे. मी मनात विचार करीत होतो की संगमरवरी मूर्ती म्हणजे कितीतरी हजारांचा प्रश्‍न आपण किती पैसे बरोबर घ्यावेत?”

महाराज हसत हसत भक्ताकडे बघतम्हणाले.
“अरे तुला जेवढे जमवून घेता येतील तेवढे घे. बाकीच्या आधिक लागणाऱ्या पैशाची चिंता नको. देवाच्या मूर्तीबाबत माणसानं चिंता कशाला करायची.?”

आता भक्ताला चांगलाच आधार झाला. जाण्याचा दिवस गुरुवार ठरला. महाराज मूर्ती आणण्यासाठी मठातून बाहेर पडले. मठातून बाहेर पडताच महाराजांना भारद्वाज पक्षाने दर्शन दिले. एका पाठोपाठ एक असे दोन भारद्वाज पक्षी उड्डाण करुन रस्त्याच्या दुतर्फा निघून गेले. महाराज बरोबरच्या भक्ताला म्हणाले,“बघीतलेस का हे पक्षी देवानं आपल्या स्वागतासाठी सज्ज ठेवले होते. मठातून बाहेर पडून पांदीत (रस्त्यात) येताच त्यांना देवानं आज्ञा दिलेली असावी.”

यावर आनंदी मुद्रेने भक्‍त म्हणाला आपल्या हिंदू संस्कृतीत भारद्वाज पक्षी (कुकूड कोंबडा) हा शुभशकुन मानला जातो. आपला प्रवास चांगला होणार. आपलं काम ही यशस्वी होणार. “महाराज म्हणाले, खुळा कुटला! आरं देवाच्या कामाला कधी अडथळा येत नसतो आणि समज आलाच तर देव त्याला समर्थ असतोच!”

अशा प्रकारचे भक्ताचे व महाराजांचे संभाषण वाटेला झाले. महाराज भक्‍तासमवेत चालत मलकापुरात आले. तेथेही त्यांचे काही भक्‍त बरोबर जाण्यास सज्ज झाले. हा सारा भक्तांचा गोतावळा घेऊन महाराज राजस्थान या ठिकाणाकडे निघाले. महाराज कोल्हापूरात पोहचले. कोल्हापूरात पोचताच एक अज्ञात भक्‍त आला. त्यांने महाराजांचे दर्शन घेतले. महाराजांनी त्याला काखेच्या कुंचुकीतून प्रसाद दिला. त्या भक्ताने महाराजांना नोटांचे एक बंडल दिले. “मूर्ती ठरवताना मोजा” असे म्हणून तो अज्ञात भक्‍त नाहीसा झाला.

हा घडलेला प्रकार महाराजांनी कुणालाच सांगितला नाही. नोटांचे बंडल त्यांनी आपल्या कुंचुकीत टाकले. परत पुढे प्रवासाला प्रारंभ झाला.

राजस्थान या ठिकाणी महाराज तीन दिवसांनी पोचले तेथील मुर्तीकारांना ते भेटले. अस्सल दर्जाचा कलाकार त्यांनी दोन दिवस थांबून हुडकुन काढला आणि त्याला म्हणाले,

“बाबा रं, तू माझ्या गुरुंची मूर्ती तयार करुन दे. चांगल्या संगमरवराची आणि चकचकीत ताजीतवानी दिसणारी मूर्ती तूच तयार करावीस असे माझे मत आहे.”

मूर्तीकाराने महाराजांच्या चेहऱ्यावर नजर फेकली. त्याला काय वाटले कुणास ठाऊक? क्षणभर थांबून आणि हनुमानाची मूर्ती खाली ठेवून मूर्तीकार म्हणाला,

“आपला शब्द मी झेलतो खरं, पण कालावधी चार – सहा महिन्यांचा लागेल”
“चालेल पण सद्गुरुंच्या फोटोसारखीच वठवली पाहिजे हं ss”
“अँडव्हान्स दोन हिस्से रक्‍कम दयावी लागेल. करारनामा मी लिहून देईल.”

भक्तांच्याकडे बघत बघत महाराज म्हणाले,

“सर्व काही कबूल. तरीपण एक अट आहे मला मूर्ती लवकरात लवकर दिली पाहिजेस.”

“एवढी घाई का करता महाराज?”

त्याचं कारण असं- ”

“लेकराला सोडुन कायमचीच या जगातून निघून गेलेली आई जर त्या लेकराला मूर्तीरुपानं पुन्हा दिसली तर त्या लेकराला जो आनंद होईल तोच आनंद ही मूर्ती पाहिल्यावर मला सदैव मिळणार आहे. त्या आनंदाच्या पूर्तीसाठी मी हापापलो आहे. म्हणून मला माझ्या प. पूज्य सद्गुरुंची मुर्ती लवकर हवी आहे.”

कलाकार महाराजांच्या मुद्रेकडे बघत म्हणाला “महाराज मला आपल्या भावना समजल्या. मी तसा प्रयत्न करीन.” कलाकाराच्या पदरी अँडव्हान्स रक्‍कम पडली. करारनामा झाला. महाराजांनी सद्गुरुंचा फोटो कलाकाराला दिला. साऱ्यांना चहापान झाले. महाराज व भक्‍त सौते गावच्या मठाकडे आले.

सौते मठात इतर मूर्तीची स्थापना

“देव भाग्ये घरा | येती संपत्ती त्या सकळा ||” (तु.म.)

सौते गावचा मठ बालदास महाराजांनी आपल्या गुरुंची संगमरवरी मुर्ती बसवून पावन केला. अनेक हजार रुपये खर्च करुन गुरुंची मूर्ती बसविल्यानंतर बालदास महाराजांचे मन शांत झाले. दररोज भजन व पुजन या गोष्टी सौते मठात नियमितपणे होऊ लागल्या. पंचामृताचा अभिषेक गुरुंच्या मस्तकावर दररोज घडु लागला. अभिषेकाच्या वेळी बालदास महाराज मनाने तृप्त होत. त्यांना असे वाटे की जणु काय आपले गुरुच तो अभिषेक प्रत्यक्षात मस्तकावर घेत आहेत.

गुरुंच्या समोर नित्यनियमानं फुलांचा आणि सुगंधी वस्तूंचा वर्षाव होऊ लागला. अनेक स्त्री पुरुष भक्तांनी त्यांच्या गुरुंच्या समोर फळाफुलांचा अक्षरशः पाऊस पाडला. फळा फुलांचे डोंगराच्या डोंगर बालदास महाराजांच्या समोर जमू लागले.

आपल्या गुरुंच्या मूर्तीनंतर महाराजांनी अनेक मुर्ती सौते गावाच्या मठात आणल्या. या सर्व मुर्ती संगमरवरी आहेत. यांपैकी विष्णू, लक्ष्मण, राम, सीता, विठ्ठल व रखूमाई या मूर्ती मठात म्हणजे मुख्य गाभाऱ्यात आहेत. श्री दत्तगुरु, हनुमान, गरुड, शंकर, गणपती व सरस्वती या मूर्ती गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला आहेत. या सर्व संगमरवरी मूर्तीच्या वरती स्वतंत्र अशी छोटी छोटी देवळे आहेत या देवळांना स्वतंत्र अशी दारे आहेत. मुख्य गाभाऱ्याच्या समोर या मुर्ती गाभाऱ्याकडे तोंड करुन उभ्या आहेत. त्यामुळे सर्व मुर्तीचे समवेत बालदास महाराजांचे गुरु जणु काय ध्यानमग्न झाले आहेत असा क्षणभर भास होतो. देवांच्या मेळाव्यात बसलेला आपला देव – गुरु बघून महाराज फार समाधानी होत.

“माझ्या देवाला मी देव्हार्‍यात एकटा ठेवलेला नाही तर साऱ्या देवांच्या समवेत अधिष्ठित केलेला आहे.” असे महाराज कधी कधी भक्तांना सहजपणे सांगत.

सौते मठाचा त्याग

भोग भोगावरी द्यावा | संचिताचा करुनी ठेवा || (तु.म.)

एके दिवशी अचानकपणे महाराजांनी सौते मठ सोडला. महाराज सावर्डे येथे जाऊन गणपती पाटील यांच्या छपरात राहू लागले. तेथे त्यांची सेवा करणारे अनेक भक्‍त गोळा होऊ लागले. बजागवाडी, कोपर्डे, सौते, शिरगाव, कोकरुड, सावे, सावर्डे सांबु मोळवडे… इत्यादी गावच्या भक्तांनी त्यांची थुंकी तळहातावर झेलली. महाराजांच्या सेवेत हे भक्‍त रात्रंदिन मग्न झाले.

महाराष्ट्रातून कोणीही भक्‍त महाराजांना भेटण्यासाठी आला तर तो भक्त त्या गणपती पाटलाच्या सपराकडे जाऊ लागला. कारण त्यांचा देव त्या सपरात थांबला होता. त्यांच्या भेटीला आतुरलेला भक्‍त तिथे जाणार नाही तर मग कुठे जाणार?

साध्या पाल्याच्या छपरात महाराज राहत होते. त्या छपराला कामटाचं तडकं (दार) होतं. अशा या सामान्य जागेत प्रत्यक्ष परमेश्वरच राहात होता. या छपरात महाराजांचा झाडपाला शिजत असे. तेथेच महाराज घोंगडीवर या पाल्यापाचोळयाच्या छपरात राहत होते.

गणपती पाटलांच्या सावर्डे गावच्या रानातील छपरात असतानाच महाराज कधी कधी सौते मठात येऊन झाडलोट करुन जात असत. यावेळी आपल्या गुरुच्या मूर्तीला ते कवटाळून मिठी मारत. साऱ्या मूर्तीची भक्तीभावाने व मोठया श्रद्धेने पुजा बांधत असत. काहीवेळा एखादा दुसरा दिवस ते तेथे राहतही असत. पण असे प्रसंग फारच थोडे.

या छपरात महाराज तीन वर्षे राहिले. यानंतर महाराज शिरगाव येथे रामचंद्र पाटील यांच्या घराच्या पडवीला बांधलेल्या खोलीत काही दिवस राहिले. तेथेच त्यांनी आपला देह ठेवला.

स्वभाव

सहज बोलणे हितउपदेश | (तु.म.)

महाराज लहानपणी दिसायला फारच गोंडस असे दिसत होते. मूर्ती काळीसावळी आणि गोजिरवाणी असे वर्णन करायला हरकत नाही. अंगापिंडाने धडधाकट होते. कपाळ भव्य होतं. शरीर दिसायला तकतकीत होतं, अंगावरचे काळेभोर बारीक केस दिसायला फारच छान दिसत. त्यांच्या उघडया शरीरावर त्यांची चकाकी अप्रतिम दिसायची.

महाराज जेव्हा वयाने व ज्ञानाने मोठे झाले तेव्हा त्यांच्याजवळ भक्तगण जमू लागला. महाराजांना मेळावा आवडू लागला. महाराजांची देहयष्टी जशी मोठी होती तसेच त्यांचं मनही विशाल होतं., सागरानं जसं आपल्या पोटात दडवावं तसंच महाराज वाटत. चांगल्या वाईटांचा अनुभव महाराजांना मिळू लागला वाईटांना तुच्छ मानुन महाराज दूर कधीच लोटत नसत. दुर्जनांना ते उपदेश करत चांगलं वागण्याचे शिक्षण देत.

अंगावरचे काळेभोर केस छान दिसत. जमीनीला लोळणाऱ्या जटा, सहाफूट उंची, म्हवाच्या पोकडी सारखी असणारी दाढी, रुंदवट असणारी छाती असे हे महाराज बोलताना असे बोलत की ऐकणारा गप्प ऐकत बसे. अशा या प्रचंड फौजदारापुढे शिपाई उभा राहतो तसे भक्तगण उभे राहत. त्यांच्या पुढं बोलायचं कोणाचंच धाडस होत नसे. महाराजांनी सांगावं आणि भक्तांनी ते निमुटपणे ऐकावं अशीच अवस्था महाराजांच्या बाबत होती. महाराज बोलतील ते सर्वजण झेलू लागले.

एकदा एक मुलगी महाराजांच्याकडे आली आणि म्हणाली,

“महाराज मी फार मोठी चूक केली आहे. त्या चुकीची उणीव मी जन्मातही भरुन काढणार नाही. याबाबत मला फार पश्चाताप झालेला आहे. तरी आता मी काय करु?

महाराज म्हणाले,

“झाली चूक होऊ दे. झाले गेले विसरुन जा तू. जी चूक केलीस त्याचा तुला

जो पश्‍चात्ताप झाला तीच तुला घडलेली मोठी शिक्षा होय. यापेक्षा दुसऱ्या तिसऱ्या शिक्षेची गरज नाही. मात्र यापुढं आता परत चूक करु नकोस.” महाराजांनी घाबरलेल्या मुलीला असा धीर दिला.

एकदा महाराजांच्याकडं एक हरिजन गृहस्थ गेला. महाराजांची ख्याती ऐकून तो तेथे प्रथमच आला होता. महाराजांनी त्याला पिटलं आणि भात जेवायला घातला. हे सारं जेवण हा गृहस्थ पत्रावळीवर जेवला. जेवण झाल्यावर महाराजांनी त्याला आपल्या पेल्यातून पाणी पिण्यास दिले. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला,

“मला पाणी वरुन वाढा,

तेव्हा महाराज म्हणाले,

“तू आणि मी यात तू फरक मानू नकोस. देवाने का भेदाभेद कधीच सांगितलेला नाही. हा भेद माणसानं निर्माण केला आहे.”

यानंतर अधिक न बोलता गप्पगुमान त्या पेल्यानं तो हरिजन गृहस्थ पाणी प्याला. महाराज मग खुळा रे खुळा असं म्हणून हसायला लागले.

एकदा एक भक्त आपल्या कोर्टाच्या कामाला निघाला. जाता जाता महाराजांचे दर्शन घेऊन जावे म्हणून आला. मठाकडे येताना वाटेत त्याच्या आडवी पाण्याची घागर आली. त्याने मठात महाराजांना हा शुभशकून सांगितला. महाराज म्हणाले,

“तुझे काम होण्याचा हा योग आहे”

एकदा एका भक्ताने आपल्या भावाबरोबर भांडणं केलं भावांन त्याला काठीनं जबरदस्त मारलं त्याला ताबडतोब मठात बोलावलं. मारणारा मनुष्य मठात आला. महाराजांनी प्रश्‍न विचारण्यापूर्वीच

“माझी चूक झालीया. मला माफ करा” असं म्हणत थरथर कापत उभा राहिला. महाराजांनी त्याच्याकडे नजर फेकताच तो हुंदके देऊन रडू लागला. महाराजांनी त्याला खाली बसवून बंधुप्रेम समजून सांगितले.

महाराजांचं अंथरुन टाकण्यासाठी एक भक्त महाराजांच्या मठात संध्याकाळी गेला. महाराजांनी त्याला आपला बिछाना टाकू नकोस असे सांगितले. महाराज म्हणाले, “माझे हातपाय धड आहेत. तोपर्यंत माझी दुसऱ्यांन सेवा करण्याची गरज काय?”

एकवेळ असं घडलं की महाराजांना काटंकोळशींदयाची भाजी एका भक्ताने आणून दिली. त्या भाजीत मीठ नव्हते. महाराज म्हणाले, मीठ आसले काय आणि नसले काय आम्हाला सारखेच.

महाराजांना एक सेठसावकार चार धोतरे व चार दंडकी घेऊन आला. त्याला महाराज म्हणाले,*मला एवढे कपडे लागत नाहीत. दोन दंडकी व दोन धोतरे मला पुरेशी होतात. एवढयावरच माझे वर्ष निघते. “याचा अर्थ असा की महाराजांना मोजकाच कपडालत्ता लागत होता. भरमसाठ कपडे वापरण्याची त्यांची मनोवृत्ती नव्हती.

एकदा मुंबईहून आलेल्या भक्तानं महाराजांना विचारलं, “तुम्हाला झोप किती तास लागते ?” यावर महाराज म्हणाले,“मी बरीच वर्षे झाली दोन तासांपेक्षा अधिक झोपलोच नाही.” म्हणजेच महाराजांना झोप प्रिय नव्हती असे लक्षात येते.

महाराज नेहमीच गुरुंच्या मूर्तीच्या सान्निध्यात बसत व तेथेच जवळ झोपत. इतके त्यांना गुरुचे प्रेम प्रिय होते.

महाराजांच्या तरुणपणात महाराजांच्या नजिकचा परिसर अगदी झाडींनी गच्च भरलेला होता. मठाच्या जवळच बादयाचं जंगल होतं. त्या जंगलात अनेक प्रकारचे जंगली प्राणी राहत होते पणमहाराज त्या जंगलातून कोणत्याही वेळी जाऊन येत त्यांचं धैर्य फार मोठं होतं.

महाराज शिजवलेला झाडपाला किंवा कच्चा झाडपाला खाताना आपल्या गुरुंना नैवेद्य दाखवूनच खात असत. गुरुच्या मूर्तीची पूजा करताना अशी पूजा करत की जणू काय गुरु त्यांच्याबरोबर बोलत आहेत असं वाटायचं.

महाराजांच्या अंगी दंभ, अभिमान यासारख्या दुर्गूणांचा अभाव होता आणि क्षमा, आर्जव आणि अहिंसा यासारखे सद्‌गुण त्यांच्या व्यक्‍तीमत्त्वात होते.

महाराजांना पाया पडून घेणं आवडत नव्हतं. तरीपण लोकांची श्रद्धा आणि भावना लक्षात घेऊन ते लांबूनच दर्शनाचा लाभ देत. काहीवेळा ते पाया पडणाऱ्यांना म्हणतं,

“देवाच्या पाया पडा. जगाचा पालनकर्ता जो ईश्‍वर त्याला शरण जावा. माझ्या पाया पडून तुम्हाला काय फायदा ?” हे ऐकुन पाया पडणारी व्यक्‍ती म्हणत असे,

“आम्हाला आपल्यात देव दिसतो. म्हणून आम्ही आपले दर्शन घेतो. आम्हाला तुम्ही ज्ञानाचे सागर वाटता म्हणून आम्ही तुमच्या समोर नम्रतेनं नतमस्तक होतो.”

महाराजांना सर्वत्र फार मोठा मान होता. त्यांचे अनेक भक्‍त खेडयांपासून शहरापर्यंत पसरले होते. पण महाराजांना कधीही त्याचा गर्व वाटला नव्हता.

तात्पर्य, महाराज हे सात्त्विक स्वभावाचे होते. त्यांच्याकडे संताला साजेसे ज्ञान होते. ते धैर्यशील होते. गरीबाचा कणवाळू होते. दया, क्षमा, शांती यांचे ते सूचक होते.

जनकल्याणार्थ देड झिजविला

“जगाच्या कल्याणा संतांच्या विश्रूती |” (तु.म.)

गुरुंच्या पाठीमागे आपले ज्ञान दुसऱ्यांना देण्याचे काम बालदास महाराजांनी केले. सौते, शिरगाव, सावे, सावर्डे, मोळवडे पेरीड, गाडयाचीवाडी, सागाव, कऱ्हाड, सातारा, पंढरपूर इ. अनेक ठिकाणी महाराज गेलेआणि त्यांनी तेथे आपली अध्यात्मिक छाप पाडली.

“संसार करावा नेटका हे सांगुन त्यांनी संसारातूनही परमार्थ कसा साधता येतो याचेही मार्गदर्शन जन्मभर लोकांना केले . जनसमुदाय प्रत्येक गावातील प्रमुख भक्ताच्या घरी अथवा चावडीवर जमवून तेथे ते प्रश्‍न आणि उत्तर या मार्गाने ज्ञान देत असत. काही वेळा अनेक धर्माचे व अनेक जातीचे लोक त्यांच्या समोर असत. अशा वेळी महाराज सर्वाचा देव एकच आहे. हे मोठया कौशल्याने पटवून देत . मग हिंदु, मुसलमान, शिख इ. जातीत परमेश्‍वर वेगळा नाहीच याची खात्री सर्व धर्मियांना होत असे. परत महाराज म्हणत सर्व धर्मातील परमेश्वराचा एकच उपदेश आहे . की “अवघ्यावर प्रीत करावी” आणि मग अशा प्रकारची चर्चा झाल्यानंतर महाराजांना सर्वजन प्रेमानं निरोप देत

थोडक्यात अशीअनेक संस्कारकेंद्रे महाराजांनी निर्माण केली होती असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

कधी कधी लहान मुलांचा मेळावा जमा करुन त्यांना ते स्वच्छतेचे धडे देत. अंगण लोटावे कसे ते खराटा हातात घेऊन दाखवत. घर कसे झाडावे ते केरसुनी घेऊन समजाऊन देत. घराभोवती गटारे उघडी असू नयेत हेही ते प्रभावीपणे पटवून देत. राहत्या घरात जनावरे का नसावीत तेही ते मुलांना सांगत आणि म्हणत.

“तुमच्या घरच्या वडीलधाऱ्या लोकांना सांगा की जनावरे घरातून बाजूला छप्पर घालून बांधा.”

महाराज कधी कधी मुलांना देवाधर्माच्या चांगल्या संस्कार करणाऱ्या गोष्टी सांगत. जेवताना कसे बसावे, खाताना कसे खावे. इ. जेवण्याखाण्याचे मार्गदर्शनही महाराज मुलांना देत.

“जगात मोठा देव आहे. त्या देवानेच आपणाला निर्माण केले आहे. त्या देवाची आपण भक्‍ती केली पाहिजे. आपण खरे बोलले पाहिजे. खोटे बोललो तर देव आपणाला शिक्षा करतो.”असा उपदेशही महाराज मुलांच्यावरती प्रतिबिंबीत करीत असत.

महार, मांग, चांभार असा जातींचा उल्लेख लोक का करतात? असा प्रश्‍न ते काही वेळा उपस्थित करीत असत. सगळेजण आपण एकाच परमेश्वराची लेकरे आहोत. मग जातीभेद का मानावा असे ते ठासून बैठकीत सांगत असतं. महाराज कधीही हरिजनांना दुसऱ्या कपबशीत चहा देत नसत. भेदाभेद ते अमंगळ मानत होते. महाराज सर्वांना समानतेने वागवत असत.

सर्व समाजाला सारखेच सुख मिळाले पाहिजे असे त्यांना वाटत होते. या जगात कुणीच दुःखी असू नये असं महाराजांचं मत होतं. त्यासाठी सर्वांनाच ते चांगला उपदेश करत. कष्टाचे खावा. फुकटाचे खाऊ नका. घाम गाळून काम करा. देव तुम्हाला अन्न देईल. आपण चांगलं वागा व दुसर्‍यांना तसे वागण्यांस शिकवा. आपला देश गरीब आहे आणि या गरीब देशात काम केल्याशिवाय खायला मागता येणार नाही. आश्रमात आंधळी पांगळी हातापायाची बोटे नसलेली मानसेही स्वावलंबनाने जगतात. मग आपण सुदृढ असून आयतं का खायचं?”

महाराजांचा उपदेश हा साऱ्यांसाठी असायचा. “सारे विशवची माझे घर” ही भूमिका त्यांच्या उपदेशात अभिप्रेत असायची.

खेडयांत काही वेळा भिक्षा मागताना महाराज घरामागच्या परसाकडे (घरामागची मोकळी जागा) बघत आणि परस बघून म्हणत,

“इथे केळी, नारळी व भाजीपाला करा. आंबट लिंबु, तिखट मिरची, गोड आंबा, सुग्रास भाजी ही तुम्हाला तुमच्या परसातच मिळेल. केवढं तरी उत्पन्न या जागेत तुम्हाला काढता येईल. जपान देशात इंच नि इंच जमिन पिकासाठी वापरतात आणि आपण सारी जमिन मोकळीच सोडतो. योगी पुरुषाचा हा बोध बायका लगेच ध्यानात घ्यायच्या आणि त्याची फलाश्रुती म्हणून परस हिरवंगार दिसायचं.

ज्यांना घर नाही अशा गरीबांना चारचौघे श्रीमंत जवळ करुन म्हणायचेत,

“अरे श्रीमंतांनो! गरीबाची काळजी कुणी घ्यायची ? चला उठा या गरीबांना साधं कौलारु घर बांधुन दया. तुम्ही चांगल्या वाडयात राहता. मजेत तुपरोटी खाता तुमच्या गावातील गरीबांचा विचार तुम्ही मोठी मंडळी करणार नाही तर मग कोण करणार?”

असे म्हणताच श्रीमंत लाजेनं कामाला लागत. त्याचा परिणाम म्हणून गरीबांना उबाऱ्याची जागा मिळे.

काही वेळा महाराज मराठी शाळा व हायस्कुल या ठिकाणी जात येथे शिक्षकांना भेटून म्हणत,

“बाबांनो तुम्ही फक्त पोरं आणि पोरी शिकवता पण तुमच्या खेडयापाडयातील मोठी माणसं अडाणी आहेत. त्याचं काय ? त्यांना तुम्हीच मोकळया वेळात शिकविलं पाहिजे. ते काम तुम्हीच केलं पाहिजे.” अशा बोलण्यानं ते शिक्षक लगेच कामाला लागायचे.

अशा प्रकारे महाराजांना साऱ्या जनतेची काळजी पडायची. सारा भाग सुखी बनला पाहिजे सारे शिकले पाहिजेत. साऱ्यांना चांगले दिवस बघायला मिळाले पाहिजेत अशी साऱ्या जगाची चिंता त्यांना वाटायची. सारा देह महाराजांनी जनकल्याणासाठी झिजविला.

“मना चंदनाचे परि त्वा झिजावे | परि अंतरी सज्जना निववावे ||”

या रामदास महाराजांच्या उक्ती प्रमाणे बालदास महाराज आमरण झिजले. केवळ देवाची प्राप्ती होण्यासाठी ते झिजले नाहीत. देव तर त्यांना साध्य झालाच पण सर्व लोकांच्या आत्म्यातील परमात्म्यालाही त्यांनी सांभाळलं. माणसाच्या आत्म्यात असणाऱ्या परमेश्वरावर त्यांनी प्रेम केलं आणि त्यांनी सामान्य जनाला दाखवून दिलं की परमेश्वर म्हणजे तुमचा आमचा आत्मा.

“अहं ब्रम्हास्मी” ही भावना जवळ येईल त्या त्या भक्‍ताच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न महाराजांनी केला.

प. पूज्य स्वरुपानंद महाराज (पावस) म्हणतात,

“आणिकांचे सुख देखोनि जो सुखी |
होय धन्य लोकी तोची संत || १ ||
आणिकांचे दुःख देखानिया डोळा
येई कळवळा तेचि संत || २ ||
आणिकांचे दोष आणिना जो मनी
गुणाते वाखाणी, तोचि संत || ३ ||
लोककल्याणार्थ वेंचि जो जीवित
संत तो महंत स्वामी म्हणे || ४ ||

आपल्या देशातला संत हा खऱ्या अर्थानं संत असावा अशी त्यांची कामना होती आयते खाणारे संत “खादीला कार आणि धरणीला भार” असे महाराज म्हणत. आयते खाऊन मगरमस्त झालेल्या संतांनी समाजाची सेवाही सोडली आणि स्वत:चा आत्मविश्वासही गमावला. असं महाराजांच परखड मत असायचं. देवाच्या प्राप्तीबरोबरच आपण संतांनी समाजाची सेवा करणे महत्त्वाचे आहे असे महाराजांचे मत होते.

“काही वेळा माता आपल्या मुलाला दुध, तुप खाऊ न घालता त्यांच्या तोंडावर मारुन गावात आलेल्या संताना खाऊ घालतात. कोणीतरी ढोंगी संत गावात म्हणा किंवा भागात येतात आणि सारी गावे त्यांच्या मागे लागतात. साऱ्या भक्तांचे तो साधू शोषण करतो. स्त्री – पुरुषांचे मेळावे घेऊन दिंडया काढतो. खोटी नाटी नाटके करुन सामान्य जनांना नाडतो. असे बोके समाजातून लाथा घालून हाकलून दिले पाहिजेत अशा प्रकारचे विचार महाराज तळमळीने मांडत.

नोव्हेंबर १९६२ ला ज्यावेळी चीनने आपल्या देशावर आक्रमण केले तेव्हा महाराज गप्प बसले नाहीत. महाराजांनी गावोगाव प्रवास केला आणि लोकांना मदत पाठविण्याचे आवाहन केले. काही सेठ सावकारांच्या घरी जाऊन त्यांना देशासाठी पैसे पाठविण्याचे आवाहन केले. पाकिस्तानाने केलेल्या आक्रमणांच्यावेळेही तीच कामगिरी महाराजांनी बजावली. देश आणि देशातील माणसं संकटात असताना गादयावर लोळुन मिष्टान्नाचे ढेकर देणारे संत त्यावेळीही होते आणि आजही आहेत. अशा संतांना खऱ्या अर्थाने संत म्हणता येणार नाही.

बालदास महाराजांनी राष्ट्रीय कार्यातही भाग घेतला होता. राष्ट्रीय संत म्हटलं तरीही वावगे होणार नाही. राष्ट्रासाठी झिजणारा हा महान संत होता. कुठे वादळी वारे झाले तर महाराज तेथील माहिती वर्तमानपत्रात बघत. रेडिओवर लगेच ऐकण्यास उत्सुक असत. कुठे नदीला महापूर आलाच तर महाराज वाहून किती गेले आणि जगले किती हे जिव्हाळयानं बघत. भुकंप, वादळ, महापूर… या सारख्या नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या लोकांना महाराज सढळ हाताने मदत करण्यासाठी गावोगाव फिरत आणि मदतीचा लोंढा तिकडे लावत. काही वेळा आपण मागितलेली घरे महाराज मदतीसाठी म्हणून वापरत. मदत जास्त मिळावी म्हणून म्हणत,

“अरे बाबानों ज्यांच्याकडे जगण्यासाठी अजिबात साधन सामग्री शिल्लक नाही त्यांना आपण काही नाही दिले तर मग कोण देणार? धडसं कापड ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे उघडयाबंब माणसानं बघीतल तर त्यात नवल काय? आपण सारे भाऊ भाऊ आहोत तर मग आपण आपलं पवित्र कर्तव्य करायला नको काय?”

अशा प्रकारच्या बोलण्यामुळे देताना भक्तांचा हात मोठा व्हायचा, महाराजांना त्यामुळे आनंद व्हायचा. जमाव जमवून बसलं असता काहीवेळा महाराज भरमसाठ वाढलेल्या लोकसंख्येवर बोलत. ते म्हणत,

“आपल्या देशात दर सेकंदाला एक मूल जन्माला येते आणि वीस पंचवीस वर्षात जगाची लोकसंख्या आहे त्यापेक्षा दुप्पट होईल. मग विचार करा काय परिस्थिती निर्माण होईल. पुढची वाईट अवस्था टाळण्यासाठी आपण लोकसंख्या मर्यादीत ठेवणे आपल्या सर्वांच्याच हिताचे आहे. तुम्हाला हे पटत असेल तर ध्यानात घ्या.”

दारु, जुगार, मटका… असे खेळणारे लोक महाराजांच्या दर्शनाला कधी कधी चुकून येत. अशा लोकांना महाराज कावून खिसकून चांगलं वागण्याचा उपदेश करत. ते लोक गप्प ऐकून घेत. ऐकून परत निघाले की पाठमोऱ्या झालेल्या लोकांना ते पाठीमागून म्हणत,

“ती बायकापोरं काय तुमच्या नावान बोंबलतील काय ? त्यांच्यासाठी कायतरी साठवत तरी जावा”

राष्ट्रासाठी हा एक धडपडणारा संत होता. म्हणूनच त्यांना राष्ट्रीय संत म्हणण्यास हरकत नाही. वैयक्तिक सुख दुःखात न गुंरफटता साऱ्या राष्ट्राच्या सुखदुःखाला बांधून घेतलेला हा महान संत होता. प्रसिद्धी पासून अलिप्त राहिलेला पण संतांच्या कर्तव्याला जागणारा हा एक महान संत होता.

उपदेशसार

“अनुभवे आले अंगा | ते या जगा देतसे ||” (तु.म.)

महाराजांचा उपदेश हा भाविकांना अमृतासारखा गोड वाटायचा. ज्ञानेश्‍वरी, दासबोध, भागवत, अभंगगाथा या ग्रंथांचा महाराजांनी विशेष अभ्यास केला होता. याशिवाय एकनाथी रामायण, भक्तिविजय, हरिविजय, पांडवप्रताप इ. धार्मिक ग्रंथाचेही त्यांनी मनोमन वाचन केले होते.

महाराजांचा उपदेश व्याख्यानाच्या रुपाने किंवा लांबलचक अवघड शब्दांत मांडलेला नसायचा. महाराज सहज भोवती बसलेल्या लोकांना सहजतेने ज्ञानाचा डोस पाजत असत. आपण उपदेश करताना जर भक्तांन प्रश्‍न विचारलाच तर महाराज त्याचे समाधान होईपर्यंत उत्तराची सरबत्ती चालू ठेवत.

सहज भोवती जमा झालेल्या लोकांना महाराज सांगत, “ अरे बाबांनो! परमेश्वर हा आपलासा करा. त्यासाठी त्याच्यावर श्रद्धा ठेवा. मनी भाव नसेल तर देव पावणार नाही. देवाचं महत्त्व तुम्ही परडयातल्या किंवा शेतातल्या भाजीपाल्यासारखं समजू नका. परमेश्वर आपलासा करण्यासाठी शुद्ध अंत: करण गरजेचे आहे. मन शुद्ध बनल्याशिवाय परमेश्वराची कृपा होत नाही. परमेश्वर मिळविण्यासाठी ज्या निरनिराळया साधना केल्या जातात त्यांचा हेतू हा मन शुद्ध करणे हाच असतो. तुमचे मन पाक करा म्हणजे परमेश्वर तुमचासा होईल.”

ते भोवतीनं जमलेल्या समाजाला म्हणत की, बाबांनो! माणसानं आपली कार्यसिद्धी होण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न महत्त्वाचा आहे. केवळ कामाची जबाबदारी देवाकडं सोपवून चालत नाही. म्हणून म्हणतात की, “प्रयत्नांती परमेश्वर.”

महाराज असेच एका खेडेगावी गेले होते. तेथे त्यांच्या गुरुच्या प्रतिमेची स्थापना केलेली होती. त्या कार्यक्रमात त्यांना निमंत्रित केले होते. तेथे जमलेल्या लोकांपैकी एकानं विचारलं, “महाराज अंतरात्मा म्हणजे काय ?” महाराज उत्तरले सर्व प्राण्यांच्या ठिकाणी अंत:करणात तो एकटाच अंतरात्मा वस्ती करुन राहतो.

“सकळ चालिका एक | अंतरात्मा वर्तवी अनेक |
मुंगी पासोनी ब्रम्हादिका | तेणेंचि चाळती ” | (१०,१०,३५)

दासबोधात हा भाग चांगलाच समजावून दिला आहे. त्या अंतरात्म्याचे वर्णन करताना स्वामी म्हणतात,

“ तो कळतो पण दिसत नाही.” त्याची प्रचिती येते पण भासत नाही. प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात तो असूनही एके ठिकाणीच कुठे तो आकाशात , जलाशयात, इतकेच नव्हे तर प्रत्येक मात्रात सामावून असतो. वायूहूनही तो चपळ आहे. दृष्टीनी तोच पाहतो. कानाची तोच ऐकतो. जीभ, नाक, त्वचा या इंद्रियांच्या क्रिया करणाराही तोच अंतरात्मा अशा त्याच्या सूक्ष्म अंतरकळा असतात.

पृथ्वीमध्ये जितुके शरीरे |
तितुकी भगवंताची घरे | (२०,४४)
देऊळ म्हणजे नाना शरीरे |
तेथे राहिजे जीवेश्वरे | (१७,१,१३)
चालती बोलती देऊळे |
त्यात राहिजे राऊळे | (१७,१,१४)
नारायण असे विश्वी | त्याची पूजा करीत जावी
याकारणे तोषवावी | कोणीतरी काया || (१५,९,२५)

हे सर्व मी रामदास महाराजांच्या दासबोधावरुन सांगितले आहे. असे सर्व सांगितल्यावर महाराजांचा दासबोधाचा अभ्यास त्या भक्ताच्या लक्षात आला. परत त्याच भक्ताने महाराजांना,“अंतरात्म्याची उपासना कशी करायची ?” असा प्रश्‍न केला. त्याचे उत्तर महाराजांनी सर्वांना उपदेश पर दिले. महाराज म्हणाले,

“समाजातील प्रत्येक व्यक्तीचे शरीर म्हणजे एक – एक देऊळ होय. त्या देवळात राहणारा भगवंत म्हणजेच अंतरात्मा. त्याच्या सुखासाठीच शरीर मनाने झिजणे हीच अध्यात्माच्या भाषेत अंतरात्म्याची उपासना होय. व्यवहारात तिलाच “समाजसेवा ” असे म्हणतात. ही समाजांतर्गत अंतरात्म्याची उपासना “विश्व पाळती” असल्यानं अशा उपासकाला सर्वत्र देवच देव दिसू लागतो. ही उपासना कोणालाही कोठेही आणि केव्हाही व कशीही करता येते. कारण “आत्माराम, अंतरात्मा” कोठे नाही असे ठिकाणच नसल्याने त्याची उपासनाही सकळां ठायी साधता येते “ऐसी माझी उपासना” नुसत्या अनुमानाने समजणार नाही. तिचा अनुभवच घेतला पाहिजे.असे स्वामींचा दासबोध सांगतो. हीच सर्वव्यापिनी उपासना साधकाला निरंजना पलिकडे नेऊन घालील. इतका तिचा प्रभाव आहे. (१५,९,२९)

उपासना केल्याशिवाय जय होत नाही.

“उपासनेचा मोठा आश्रयो | उपासनेवीण निराश्रयो |
उदंड केले तरी जयो | प्राप्ती नाही” (१६,१०॥२९)

अंतरात्म्याची उपासना वा भजन प्रत्येकाने केलेच पाहिजे.” महाराजांच्या मुखाकडं तो प्रश्‍न विचारणारा बघतच राहिला होता. त्याच्या लक्षात पूर्णपणे नंतर आले की महाराजांचा दासबोध हा पाठ आहे. व्यवहारी भाषेतही त्याचा अर्थ ते व्यवस्थित लावू शकतात. नंतर महाराजांना नमस्कार करुन तो खेडूत बाजूला गप्पगार बसला. जमलेल्या साऱ्या लोकांच्या लक्षात महाराजांचा उपदेश आला.

नरदेहांच महत्त्व फार मोठे आहे. माणसाने आपला देह परोपकारार्थ झिजवून किर्तीरुपे उरले पाहिजे. नरदेह हा परोपकाराचे व परमेश्वराचे केवळ साधन आहे. नरदेहात परमेश्वर वास करतो. म्हणून तर या देहाला विशेष महत्त्व आहे.

“आपण स्वंये तरले | जगांसहि उपेगा आले |”

असा नरदेहाचा दुहेरी उपयोग आहे. आयुष्य ही अमूल्य रत्नांनी भरलेली पेटीच होय. या आयुष्यात भक्ती, सेवा, त्याग, उपासना इत्यादी कितीतरी बहुमोल रत्ने भरलेली असतात, ही सर्व भूषणे ईश्वराला अर्पण करावीत आणि त्यापासून लाभणारा शाश्वत आनंद जन्मभर लुटावा. विषयांच्या सेवनात हा नरदेह व्यर्थ दवडू नये. आपलं आयुष्य क्षणाक्षणानं काळाच्या स्वाधीन होत आहे. म्हणून आपण एक क्षणही वाय घालवू नये. हे सारं आयुष्य आपण ईश्‍वराकडेच खर्ची करावं.”

“देह म्हणजेच मी” ही देहबुद्धी माणसात असू नये. पण त्याचा यथायोग्य वापर करुन स्वतःचा समाजाचा व देशाचा असा विविध आत्मोद्धारही साधकाने साधावा.” हा दासबोधातला उपदेश तुम्ही सर्वांनी घ्यावा असे महाराज म्हणत.

“आपण भक्‍ती जर केली तर त्यामुळे देव आपणास साध्य होतो. देवाची भक्‍ती करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पूजा साहित्याची गरज लागत नाही. केवळ शुद्ध भावनेनं देवाला भजलं तरी पुरेसं आहे. कामातून किंवा तुमच्या शेतीवाडीतून मिळणारा जो मोकळा वेळ असतो तो वेळ तुम्ही सर्वांनी देवाच्या नामस्मरणात घालवावा. देवाच्या नामस्मरणासारखा सोपा मंत्र या जगात दुसरा नाही.

आपलं वय बेरजेनं वाढतं पण त्याचवेळी आयुष्य मात्र वजाबाकीनं कमी होतं. याची जाणीव ठेऊनच वागलं पाहिजे. आपल्या आयुष्यात आज उगवलेला दिवस परत पुन्हा कधीच बघायला मिळत नाही. क्षण हा अनंतकाळातून जन्माला येतो आणि तोच क्षण अनंत कालाकडे पुन्हा जातो. तर यावेळेचा उपयोग शहाण्यांनी चांगलाच करावा. वाईट संगतीत, आळसात, दुर्व्यसनात… व्यर्थ वेळ गमावू नये.”

देव मंदिरात बसला

“भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग/ज्ञान ब्रम्ही भोग ब्रम्ह तनू ||” (तु.म.)

महाराजांनी १९६४ च्या सौते गावाच्या सप्ताहात असे सांगितले की येथून पुढच्या काळात मला त्रास होणार आहे. आणि नेमकी तीच रुखरुख साऱ्या भक्तांना त्या रातीला बोचली. साऱ्या भक्ताच्या अंत:करणात ती रुखरुख सलत राहिली. आणि खरोखरच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते सन १९६५ पासून आजाराच्या आधीन झाले.

महाराजांच्या मस्तकाचा दाह चालू झाला. तो दाह कमी व्हावा म्हणून प्रथम काही दिवस त्यांच्या माथ्यावर खोबरेल तेल चोळण्यात आले. पण उपयोग काहीच झाला नाही. दिवसेंदिवस दाह वाढतच चालला. वाढत्या दाहकतेने महाराज अधिकाधिक बेचैन होऊ लागले. नंतर महाराजांनी कवारफोडीचा उपयोग माथ्यावर करण्यासाठी आपल्या भक्तांना सूचविले, कवार फोडींचा ढीगच्या ढीग महाराजांच्या पुढे पडू लागला. कवारफोड सोलून तिच्यातील गाभा महाराजांच्या मस्तकावर भक्त खसाखसा चोळू लागले. विस्तवात टाकलेली कवारफोड जशी रटरट उसळते तशीच ती कवार डोक्यावर उसळू लागली . कवार चोळणाऱ्याचे हात चटाचटा भाजू लागले.

महाराजांचा आजार आता महापुराच्या वाढत्या पाण्याप्रमाणे वाढू लागला. महाराजांचा धष्टपुष्ट देह झिजू लागला होता. अन्नचा त्याग व झाडपाल्यावर उपजिविका, त्यातच हा आजार मग भक्त हो ! विचार करा या अवस्थेत महाराजांचा देह कसा असणार? पाण्यातून बाहेर काढलेला मासा जसा तळमळतो तसे आमचे महाराज तळमळत असत. भिंताडाला टेकून बसणंच महाराजांना आवडायचं.“भिंताडाला टेकून बसल की जरा बरं वाटतंय” असे महाराज म्हणायचे. टेकण्यासाठी लोड किंवा तक्या आणतो म्हटलं तर महाराज त्या भक्‍ताला कावत असत. ते म्हणत “अरे बाबा ! गादी आणि तक्या संताला काय करायचा?”

उन्हाळयाच्या दिवसांत महाराजांची फार तलकली व्हायची. त्यांच्या अंगातून घामाचे लोटच्या लोट चालायचे. त्यांचा जीव कासावीस व्हायचा. त्यातच खोखल्याची उसळी आली तर महाराजांचे डोळे पांढरे करण्यापर्यंत मजल जायची. अस झाल की सारा भक्तगण महाराजांच्या अवतीभोवतीनं पळायला लागायचा. परत महाराजांची मूळ अवस्था आली की सारे श्वास सोडायचे. त्यावेळी महाराज म्हणायचे,

“आरं बाबांनो! एवढं भिता कशाला ? केव्हातरी हा नरदेह मातीच्या अधीन करायचाच आहे की. माझं व्हायचं ते होऊ दे पण तुम्ही घाबरु नका.”

उन्हाळयातील पहाट महाराजांना प्रिय वाटायची. झांजड पडतानाच महाराज म्हणायचे, “आता पहाट कधी बघायला मिळायची रात अगदी वैऱ्याचीच वाटातीया. आजाराचा ताप त्यात उकाडयाचा ताप पहाटेचं गारगार वारं अंगाला बरं वाटतं, मनाला थोडासा थंडावा पडतो.”पावसाळा आला की , शरीराचा दाह थोडा कमी वाटायचा याचा अर्थ महाराजांना आराम पडायचा असा नव्हे किंवा भक्तांना विश्रांती मिळायची असेही नव्हे. कवारीचं पाणी डोक्यावर टाकणे व माथ्यावर ते चोळणे हे सर्व नेहमी प्रमाणेच चाले. पावसाळयात महाराजांना झाडपाला फारच कमी लागे. कारण त्यांचं खाणंपिणं अगदिच कमी व्हायचं. मुठभर पाला ते शिजवून खात आणि तेवढयावरच त्यांचा दिवस गरगरीत निघत असे. या दिसात मात्र हिरवा भाजीपाला ते शक्‍य तो खात नसत. पाणी पितानाही ते थोडसं गरम पाणीच पित असत. कारण थंडगार पाण्याचा त्यांना त्रास होत असे.

पावसाळयात भेटायला येणाऱ्या भक्तांची गर्दी थोडी कमी असे. कारण महाराजांच्यापर्यंत जाण्यास कोणत्याच प्रकारचे वाहन नसे. खेडयापाडयांचे रस्ते कच्चे असायचे आणि त्यामुळे पावसाळयात चिखल तुडवत जाण्यापलिकडे दुसरा काय उपायच नसायचा.

हिवाळा मात्र आल्हाददायक वाटायचा. हिवाळयात महाराज थोडासं उत्साहीत असायचे.

त्यांच्यासमोर फळाफुलांचा ढीग पडायचा. त्यांकडे महाराज काहीक्षण प्रसन्न नजरेनं पाहात असत. त्यांची ती नजर प्रेमानं भरलेली अशीच असायची. त्यांच्या नजरेतून जणु काय सुखाचा वर्षावच होत आहे असं वाटायचं आणि क्षणभर महाराज आजारीच नाहीत असा पटकन भास व्हायचा. याच संदर्भात ज्ञानेश्वरीतील

“ते वाट कृपेची करितु | ते दिशा चि स्नेहें भरितु |
जीवातळि आंथरितु | आपुला जीऊ

हा श्लोक आठवल्याशिवाय राहत नाही.

महाराजांना हिवाळा थोडा बरा वाटायचा. म्हणून भक्तगण म्हणायचा “महाराज,आपणाला हिवाळा बरा वाटतो. कायम हिवाळाच पृथ्वीवर असायला पाहिजे.” यावर महाराज म्हणत,

“आरं कसला हिवाळा आणि कसला पावसाळा घेऊन बसलायला मला सगळं ऋतू सारखंच झाल्यात. कोणत्याच ऋतूत मला समाधान आता मिळंनासं झालंया. आता शेवटच्या विश्रांतीचीच वाट बघायची चाललीया.”

महाराजांचे असे बोल ऐकले की सारा भक्तगण गप्प गप्प व्हायचा. सेवा करणारे गप्पगुमान सेवाच करायचे आणि त्यांचा चेहरा न्याहाळत बसणारे तोच उदयोग करीत राहायचे.

इ.स.१९६५ सालापासून महाराज आजारात त्रस्त झाले. काही काळ त्यांनी सोते मठात काढला. त्यानंतरचा काही काळ सावर्डे गावच्या गणपती पाटलांच्या छपरात काढला. तेथे ते ३-४ वर्षे होते. त्यानंतरचा काही दिवसांचा कालावधी त्यांनी शिरगाव येथे रामचंद्र पाटील यांच्या घरच्या ओसरीला बांधलेल्या खोलीत काढला.

रामचंद्रपाटील त्यांच्या घरातील सर्वांनी महाराजांची फार भक्तीभावाने सेवा केली. महाराजांना घराच्या भिंतीला लागूनच त्यांनी शेड मारुन खोली करुन दिली. धुनी, त्यांच्या सद्गुरुंचा फोटो पुजण्याची व्यवस्था इत्यादी आवश्यक वाटणाऱ्या बाबी तेथे करुन दिल्या गेल्या.

महाराजांच्यासाठी रामचंद्र पाटलांनी कवारीचा ट्रक बाहेरून आणला आणि कवारीची लागण स्वतःच्या परसात केली. त्यामुळे पाहीजे तेव्हा महाराजांना कवार मिळू लागली. शिरगाव येथील वास त्यांचा फार महत्त्वाचा आहे. या ६-७ वर्षांच्या कालावधीत तेथील निवासाला देवळाचं स्वरुप आल होतं. सारा भक्तांचा लोंढा शिरगाव गावाच्या दिशेने येऊ लागला होता. ते खेडेगाव अगदी धन्य झाल होतं. एखादया खेडयात गंगा अचानक प्रकट व्हावी आणि त्यामुळे तेथे भाविकांची तुंबळ गर्दी व्हावी तीच अवस्था महाराजांच्या अगमनामुळे शिरगावला प्राप्त झाली होती.

गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांचे पाय शिरगावच्या पांढरीला लागू लागले. महाराजांच्या निवासात येणारा प्रत्येक भक्‍त अंत:करण पवित्र करुन जाऊ लागला. सारेजण आपल्या परमेश्वराला भेटून जाऊ लागले. त्या संदर्भात –

“धन्य तो पै देश, धन्य तो पै ग्राम । जेथे निज वास, वैष्णवाचा ” या रामदासांच्या अंभंगातील दोन ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत. महाराजांच्या पदस्पर्शानं सारं शिरगाव धन्यधन्य झालं.

महाराजांचा सहवास हे त्या गावाला लाभलेलं मोठं भाग्य होतं. कारण साक्षात परमात्माच तेथे राहत होता. याची चर्चा करताना हरिविजय अध्याय १८ यातील श्लोक २५,२६ आठवल्या शिवाय राहत नाहीत. आक्रूराला रथ घेऊन कंसाने गोकुळाला पाठवला आहे. कारण कृष्णाला कपटाने ठार मारण्याचा विचार कंसानं केलेला असतो. परंतु कंस हा आपल्या परमेश्वराच्या कृष्णाच्या – पराक्रमापुढे चिलटाप्रमाणे आहे असे अक्कुराला वाटते आणि त्याचमुळे आक्कुर धाडसाने कृष्णाला आणण्यासाठी गोकुळाकडे जातो. गोकुळाजवळ येताच अक्कुराला आनंद होतो की, आपण आता डोळेभरुन कृष्णला पाहणार म्हणून.

म्हणे आजि धन्य नयन | देखेन वैकुंठीचे निधान |
पूर्ण ब्रह्म सनातन | मी पाहेन डोळेभरी ||

हाजो आनंद आक्कुराला होतो तोच आनंद या गावातील आणि पंचक्रोशीतील भक्तांना झाला होता. साऱ्यांना डोळे भरुन येथे परमेश्वर पहायला मिळत होता. साऱ्या भक्तांचा लाडका देव येथेच राहत होता.

अक्कुर हा गोकुळातील सर्व लोकांना धन्य मानतो. कारण तेथे त्यांना दररोज परमेश्वराचे मुख डोळे भरुन बघायला मिळते म्हणून,

“दुरुनी गोकुळ अक्कुरे देखता | साष्टांग घालते दंडवता |
म्हणे धन्य ब्रजवासी समंस्ता | नित्य मूख पाहती हरीचे” ||

ज्या नगरीत देव राहतो त्या नगरालाही दुरुनच अक्कुर साष्टांग दंडवत घालतो. तेथील नरनारी दररोज हरीला पाहतात म्हणून अक्कुर त्यांना भाग्यवान मानतो हीच अवस्था या शिरगावची झालेली होती.

माऊलीहुन मयाळ असलेला परमेश्‍वर शेवटी अंतीम विश्रांतीसाठी शिरगावच्या पांढरीत आला. सौते, सावर्डे, मोळवडे कोकरुड, सावे, कापशी, बजागवाडी… इत्यादी गावांच्या शिवा आपल्या पदस्पर्शानं आणि दीर्घकाळाच्या वास्तव्यानं पवित्र केल्या, नंतर महाराज – आमचा देव शिरगावच्या परिसरात अवतरला.

महाराजांना आता आपला अंत:काळ जवळ आल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी सन १९७४ ला आपल्या आवडत्या भक्तांना सांगितले,

“अरे बाबांनो! मी आता कसाबसा वर्षभराचा तुमचा आहे. मला ठरल्याप्रमाणे पुढे जाणं गरजेचं आहे. तुमचं सर्वाचं प्रेम माझ्या अंत:करणात मावेनासं झालं आहे. माझी संगत तुम्हाला उपयोगी पडेल. या वर्षभरात मी तुमच्याबरोबर फार प्रेमानं आणि समाधानानं जीवन कंठणार आहे. आयुष्यात मी तुम्हाला काय दिलं नाही. दिलं असेल ते सर्व परमेश्वराच्या भक्तीच्या दृष्टीनंच – मी जो मार्ग तुम्हाला देवापर्यंत पोहचण्याचा सांगीत आलो तोच महत्त्वाचा माना – तेच खरे मी दिलेले धन असे समजा.”

हे बोल महाराज एकादशी दिवशी सर्व भक्तांना बोलले. हे महाराजांचे बोलणे ऐकून सारा भक्तगण हालला गेला. साऱ्यांनाच आता महाराजांच्या गमनाची जाणीव झाली. मुदतही महाराजांनी जाहीर केली. या दिवसापासून सोरेजण महाराजांची अहोरात्र कसलाही आळस न करता सेवा करु लागले. सेवा करण्यासाठी परवणी लागली. महाराजांच्या पुढे पूजा साहित्याचे ढीग पडू लागले. महाराजांचे निवासस्थान उदवत्तीच्या वासात गुंगून गेले.

पुणे, सातारा, कऱ्हाड, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी…. इत्यादी ठिकाणांहून शिरगाव या गावी छोटयाशा जत्रेचे स्वरुप जवळजवळ वर्षभर चालू होते.

महाराजांनी सांगितलेली मुदत संपायला आता फक्त १५ दिवस राहिले होते. या कालावधीत ज्ञानेश्वरीचे पारायण भक्तांनी चालू केले. महाराज स्वस्थ ऐकत पडू लागले. या कालात महाराजांचा आजार थोडा शांत पडत चालला होता. महाराजांची उठण्याबसण्याची ताकद आता फारच क्षीण झाली होती. आवाज आत ओढत चालला होता. ज्ञानेश्‍वरीचं अखंड पारायण चाललं होतं. महाराज अधुनमधून डोळे उघडून आता बघू लागले. गरज वाटलीच तर हळुहळु आवाजात-अस्पष्ट आवाजात बोलू लागले.

शेवटचे दोन दिवस महाराज अगदीच वेगळे वाटू लागले. त्यांच्या मुद्रेवर एक वेगळेच तेज दिसू लागले. बरगडयांची हाडे लुकलुकत होती. आता महाराजांच्या प्रचंड असणारा तरुण पणातला देह नुसता हाडांचा सापळा बनला होता. या अस्थिपंजरात आमचा देव ध्यानस्थ बसायला लागला होता.

“बाबांनो ! मी उदयाला देह ठेवणार” असे महाराजांनी शनिवारी सांगितले. हा हा म्हणता ही बातमी सर्वत्र पसरली. मग तर भक्तांची गर्दीच उसळली. सगळया भक्तांच्या अंतरी कालवा कालव झाली. साऱ्यांनी मने काळवंडली. महाराजांच्या निवासात व निवासाबाहेर भक्तांचे समुदाय गप्प बसून राहिले. अशावेळीच महाराज एकदम म्हणाले,

“नाना पाटील या भक्ताला बोलवा.” तो भक्‍त नुकताच महाराजांच्या जवळून उठून गेला होता. महाराज का बोलवितात म्हणून तो अगदी पळतच त्यांच्या चेहऱ्यासमोर आला. महाराज म्हणाले,

“अरे नाना पाटील, मला तुझ्याकडील शिवंच्या माळातील घोंगडंभर जमीन देशील का ?”

तो भक्‍त डोळयात अश्रू आणून म्हणाला,

“देतो की महाराज देतो. आपण त्या जागेत काय करणार हायसा ?”

“मी आता काय करणार नाही. माझी समाधी तिथं जमलचं तर सारेजन बांधा.”

जमलेल्या सर्व भक्तांनी महाराजांना समाधी बांधण्याचं वचन दिलं. महाराजांना समाधान वाटलं. परत महाराज म्हणाले, “तुम्हा भक्‍तांना काय करायचे ते माझी स्मृती म्हणून करा.”

तारीख ३०-११-१९७५, रविवार कार्तिक वद्य द्वादशी या दिवशी हया महान योग्याने भक्तांना सांगितल्याप्रमाणे आपला देह ठेवला.

हे विश्वची माझे घर | ऐसी मती जयाची स्थिर |
किंबहुना चराचर आपण जाहला | (ज्ञानेश्‍वरी)

महाराज ज्या रामचंद्र पाटलांच्या पडवीला राहत होते, त्याच पडवीला पंढरीचं पावित्र्य लाभलं होतं. साऱ्या भक्‍तांचं पंढरपूर म्हणजे ती पडवी बनली होती. त्या पडवीत पंढरीचं सुख नांदत होतं. तिथं महान तपस्व्याच्या सहवासात महान शांतता मिळत होती. नव्हे नव्हे तेथे जणु शांतता नांदायला येत होती. पण या पंढरपुरातून आज विठ्ठल निघून गेला. ही पंढरी आज ओस पडली. आपला विठ्ठल या देऊळातून निघून गेला; म्हणून भक्तगण दुःखी झाला. सर्व सुज्ञ भक्तांच्या अंतरी पुढील बोल घुमु लागले –

“पंढरीचे देऊळ आज ओस होई
माझा तो विठ्ठल आज तिथं नाही.
विठ्ठलानं माझ्या सोडली पंढरी
पंढरीत माझा नाही नाही हरी
हरी माझा आहे अंतरी
ध्यान दयावे तेथे ध्वनी करी ध्वनी
हरीचे बोल ऐका ऐका तरी
हरीला प्रिय कष्ट कष्टकरी
जो जो हरीचे नाम जप करी
हरी तयाचा उद्धार करी.
हरी माझा आहे विश्‍वांतरी
तेथून भक्तांचे रक्षण करी.”

comments powered by Disqus